मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील सदस्यांसमवेत आज मुंबई येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्वलंत इतिहासाचे चित्रण करणारा विकी कौशल अभिनीत आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट पाहिला. ‘छावा’ चित्रपटाच्या या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन मंत्री आदिती तटकरे यांनी केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर इतिहासकारांनी अन्याय केला. पण, इतिहासाशी प्रतारणा न करता, ऐतिहासिक तत्त्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र पडद्यावर आणण्याचे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व देशभरात पोहोचविण्याचे काम ‘छावा’च्या टीमने केले आहे, असे सांगत ‘छावा’ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, डिस्ट्रिब्युटर, बॅक स्टेज कलाकार, पोस्ट प्रॉडक्शन टीम या सर्वांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अन्य मंत्री व आमदार उपस्थित होते.

