शहीद क्रांतीवीर बाबुराव सेडमाके जयंती उत्सव: आदिवासी संस्कृती जपण्याचा संदेश – डॉ. अशोक नेते यांचे प्रतिपादन

0
71

गडचिरोली प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक १२ मार्च २०२५ गडचिरोली- शहीद क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर सेडमाके यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त गोंडीयन धर्मस्थळ, आय.टी.आय. चौक, गडचिरोली येथे भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय समिती, गोंडवाना महिला बचत गट, राणी दुर्गावती महिला बचत गट आणि जागतिक गोंड सगा मांदी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मा.खा.डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत पूजन आणि झेंडावंदनाने उत्सवाची सुरूवात

कार्यक्रमाची सुरुवात शहीद बाबुराव सेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहणाने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन करत त्यांच्या बलिदानाचा गौरव केला.

संस्कृतीच्या जतनाचा संदेश मा.खा.डॉ.अशोक नेते

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी संस्कृती आणि परंपरेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
“शहीद बाबुराव सेडमाके यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. समाजाने एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.”
पुढे बोलत डॉ. अशोक नेते यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या थोर पुरुषांची आठवण करून दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीसाठी उभारण्यात येणाऱ्या स्मारकांचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गौरव करताना, या जागेच्या सबंधित विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास प्रामुख्याने माजी आमदार डॉ. देवराव होळी,
माजी जि.प. उपाध्यक्ष मनोह पा. पोरेटी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक चरणदासजी पेंदाम,प्रा. डॉ. नरेशजी मडावी,डॉ. निळकंठजी मसराम,नंदकिशोर नैताम,अँड. दिलीपजी मडावी, सदानंदजी ताराम,गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष सुरेश किरंगे,सचिव वसंत पेंदराम,उपाध्यक्ष गुलाब मडावी,
हरिभाऊ मडावी,याशिवाय, अनेक आदिवासी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला बचत गटांच्या प्रमुख सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

या कार्यक्रमाने आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचा ठाम संदेश दिला. सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

शहीद क्रांतीवीर बाबुराव सेडमाके यांच्या स्मृतीला वंदन करत, उपस्थितांनी त्यांच्या विचारांची जपणूक करण्याचा आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here