पुणे येथे भव्य दिव्य संविधान गुण गौरव परीक्षा २०२४ चा राज्यस्तरीय बक्षिस वितरण सोहळा सपन्न

0
70

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – मोठ्या दिमाखदार आणि डोळ्यांची पारणे फेडणारा असा भव्य दिव्य ‘संविधान गुण गौरव परीक्षा – २०२४’ चा राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे पार पडला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आद. डॉ. शमसुद्दिन तांबोळी सर तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक, साहित्यिक आद. डॉ. श्रीमंत कोकाटे सर व संविधान अभ्यासक, साहित्यिक व कवी आद. श्रीरंजन आवटे सर लाभले. सोबतच संविधान जनजागृतीसाठी कार्यरत अनेक समविचारी मान्यवर देखील विचार पिठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात ‘संविधान गुण गौरव’ परीक्षेत राज्यस्तरावर देदीप्यमान यश मिळवणाऱ्या जवळपास सर्वच विजेत्यांनी उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान स्विकारला. या गुणवंतांच्या गौरवासोबतच जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महीलांचा देखील गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून संविधान जनजागृतीसाठी प्रयत्नशील असलेले अनेक मान्यवर लाभले. उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक बंधू भगिनींचे दृश्य आणि अदृश्य सहकार्य मिळाले. गेल्या सहा महिन्यांपासून ‘संविधान गुण गौरव परीक्षा-२०२४’ हा संविधानिक आदर्श व मुल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या उपक्रमांस यशस्वी करण्यासाठी हजारो हात संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत होते. संविधान गुण गौरव समितीची संपूर्ण कार्यकारिणी यासाठी विविध प्रकारे प्रयत्नशील होती. समितीच्या प्रत्येक सदस्याने आपापल्या परीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवून त्यात लक्षणिय परीक्षार्थींची संख्या जोडली. दोनशे पेक्षा जास्त केंद्र स्थापन झाले आणि साडेबारा हजार परीक्षार्थी! दोनशे पेक्षा अधिक केंद्र प्रमुख बंधू भगिनींच्या सहकार्याने ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आली. सर्व साडेबारा हजार पेपर्स आद. विनयकुमार सोनवणे सरांच्या सहकार्याने तपासताना मला मनस्वी खुप आनंद होत होता. कारण बहुतांश परिक्षार्थींनी लेखी स्वरूपात दिलेली उत्तरे परीक्षेचा हेतू साध्य करणारी तर होतीच, शिवाय एक सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारी देखील होती. तब्बल दोन महिने अहोरात्र प्रयत्न करुन केंद्र निहाय व शेवटी राज्यस्तरीय निकाल तयार करण्यात आला.
राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा पुण्यात घेण्याबाबत ठरले आणि आद. रंजना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील टीम यासाठी जोमाने कामाला लागली. विशेष करून आद. दिलीप बनसोडे सर आणि आद. हृदयमानव अशोक सारखे सहकारी खांद्याला खांदा लावून उभे राहिले. आद. विलास पवार सरांसोबत ७ मार्च रोजी पुण्यात येऊन आम्ही प्रत्यक्ष सभागृहास भेट देऊन कामाचा आढावा घेत पुढील नियोजन केले. सर्वांना जबाबदारींचे वाटप करण्यात आले. दोन दिवस सतत समोर बसून आद. विलास पवार सरांनी मुंबईत तीन प्रकारचे तब्बल ८५ सन्मानचिन्ह बनवून ते माझ्यापर्यंत पोहोच केले. स्थानिक पातळीवर आद. रंजनाताई कांबळे यांनी सभागृह बुकींगसह अनेक मान्यवरांच्या तसेच शाळांच्या प्रत्यक्ष भेटी घेत कार्यक्रमास उपस्थितांची संख्या कमी पडणार नाही, याची काळजी घेतली. आद. आर. एन. वानखडे, आद. किशोर चव्हाण, आद. माला मेश्राम, आद. माधुरी सपकाळे-बोराळे, आद. सरस्वतीताई गायकवाड आदी संविधान गुण गौरव समितीतील केंद्रीय सदस्यांनी आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहून त्यादरम्यान दिलेली आपापली जबाबदारी देखील उत्तमरीत्या पार पाडली. आद. अनिल मेश्राम सर, आद. युवराज खोब्रागडे सर व आद. नितीन घोपे सर जरी काही कारणास्तव सदर कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसले, तरी या सर्वांनी गेले सहा महिने आपापल्या कार्यक्षेत्रात सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.
सर्वांच्याच एकंदरीत प्रयत्नातून कालचा ‘संविधान गुण गौरव’ सोहळा अतिशय भव्य दिव्य आणि अविस्मरणीय ठरला. यासाठी स्थानिक आयोजकांसह माझी सर्व संविधान गुण गौरव समिती, सर्व समन्वयक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व समविचारी मान्यवर व ज्ञात अज्ञात सर्व बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here