दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत
सिंदेवाही प्रतिनिधी – जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती आणि ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्यातील तरतुदींची माहिती सर्वसामान्य माणसाला करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते ,हा शासकीय स्तरावरून आयोजित करावयाच्या शासन निर्धारीत कार्यक्रम असतांनाच प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता आणि वेगवेगळ्या शासकीय विभागांमधील सुसंवादाचा अभाव यामुळे या कार्यक्रमाला ग्राहकांची उपस्थिती राहातं नाही म्हणण्यापेक्षा ती राहूच नये असा प्रयत्न तर केला जात नाही ना? अशी शंका निर्माण होत असल्याचे प्रतिपादन करताना शासकीय कार्यक्रम असतांनाच या कार्यक्रमात केवळ राशन दुकानदार हेच या प्रशासकीय यंत्रणेला ग्राहक म्हणून दिसतात का?इतर कुठल्या ग्राहकांपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची साधी माहितीही पोहोचू शकत नाही ,की दुसऱ्या कोणत्याही खात्याकडून त्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत नाही की स्वतः महसूल विभागाचे एवढे नायब तहसीलदार व तहसीलदार अशी यंत्रणा उपलब्ध असताना या कार्यक्रमात शासकीय प्रतीनिधी उपलब्ध होऊ नये हा केवळ योगायोग ठरु शकत नाही तर ही प्रशासकिय यंत्रणेची ग्राहक जनजागृतीप्रती असणारी उदासीनता स्पष्ट करीत आहे, आणि आम्ही अशा प्रकारच्या प्रशासकीय यंत्रणेच्या कार्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
शासन एकीकडे १००दिवसांचा कृती आराखडा जाहीर करते दुसरीकडे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत गावागावात जाऊन विशेष शिबिरात माहिती देण्याच्या आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या अडलेल्या अडणाऱ्या कामांची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची सुचना देते आणि दुसरीकडे जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हेच शासकीय अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांना मार्गदर्शन करुन ग्राहक जागृती करण्यासाठी टाळाटाळ करीत असतील ते शासनाच्या कोणत्याही योजना किती सक्षमपणे राबवत असतील याविषयी शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. असे प्रतिपादन दीपक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
पुढे बोलताना ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य याबाबत सर्वसामान्य माणूसच नाही तर चांगले सुशिक्षित, उच्चशिक्षित लोकही अनभिज्ञ आहेत परिणामी त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, याशिवाय आपण कोणतेही व्यवहार करताना लेखी पुरावे जमा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेट घेऊन आणि तोंडी व्यवहार करतो आणि अधिकाऱ्यांची तोंडी उत्तरे ऐकून परत येतो परिणामी महिनोन्महिने एखादे प्रकरण रेंगाळत पडले राहते परंतु समाधान होत नाही, आणि मग आपल्याला न्याय मिळाला नाही असा आरोप करतो ,त्यापेक्षा प्रत्येक वेळी लेखी पत्र द्या , स्मरणपत्र द्या आणि ही पत्रे जपून ठेवा भविष्यात हाच आपल्यासाठी महत्वाचा पुरावा म्हणून उपयोगी पडेल आणि समोरचा अधिकारी मी असे म्हणालोच नव्हतो किंवा तुम्ही विचारणा केली नव्हती असे म्हणू शकणार नाहीत किंवा बनवाबनवी करुच शकणार नाहीत आणि आपण योग्य न्याय मिळवू शकतो , परिणामी जागृत व्हा , आपल्या अधिकारांची माहिती करून घ्या,ही माहिती शासकीय यंत्रणा पुरवत नसेल तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून ती मिळवून घ्या आणि आपली फसवणूक,शोषण टाळण्यासाठी एकत्र या . कोणत्याही वस्तूची खरेदी करताना पावती मागायची सवय लावा तीच आपल्यासाठी भविष्यात महत्वाचा पुरावा म्हणून उपयोगी पडणार आहे,ही बाब आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवार व गावातील जनतेला माहिती करून द्या , आमच्या जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या पदाधिकारी यांचेशी संपर्क साधा आणि फसवणूक टाळण्यासाठी ते तुमच्या मदतीला धावून येतीलच एकमेकांना सहकार्य करु आणि शोषणमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करु अशी अपेक्षा दीपक देशपांडे यांनी व्यक्त केली. फसवणूक छोट्या स्वरूपात असो की मोठ्या त्याविरुद्ध आवाज उठवा आपल्या हक्कासाठी लढा द्या,हेच सांगण्यासाठी आम्ही इतक्या दूरुन रणरणत्या उन्हात तुमच्या पर्यंत पोहोचलो तर आम्हाला यासाठी मोठी रक्कम मिळते किंवा पगार मिळतो म्हणून नाही तर एक सामाजिक उपक्रम म्हणून आमच्याच खिशातले पैसे खर्च करून आम्ही तुमच्यासोबत संवाद साधून तुम्हाला सचेत करण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत ,ती तुमच्या प्रती असलेली सहानुभूती आणि आपुलकी म्हणून आणि कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून याची जाणीव बाळगून तुम्ही ही बाब अडल्यानाडल्यांपर्यंत पोहोचवावी आणि कुणाची फसवणूक होऊ नये ह्याच एकमेव उद्देशाने आम्ही इथे आलो आहोत. आणि गलेलठ्ठ पगार मिळवणारे तुमच्या अधिकारांची जाणीव तुम्हाला होऊच नये या विचाराने तुमच्यापासून काही गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे समजून घेण्याची आवश्यकता व वेळ आली आहे,असेही स्पष्ट केले.
जागतिक ग्राहक हक्क दिन१५मार्च निमित्ताने सिंदेवाही तहसील कार्यालयातील सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी जागृत ग्राहक राजा संघटनेचे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉ आनंदराव कुळे, अनिल कंठिवार, हेमंतकुमार किंदर्ले,नकटूजी सोनुले,जीवनास भरडे,कवडूजी मांडवकर,एस.पी लोखंडे, पुरवठा अधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पुरवठा अधिकारी लोखंडे यांनी केले, कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीत गायनाने झाली, त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आनंदराव कुळे यांनी केले आणि सभेला विषयानुरूप संबोधन,अनिल कंठिवार, नकटूजी सोनुले, यांनी केले व अशा कार्यक्रमांचे आयोजन जनतेच्या दरबारात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केले जावे ही मागणी उचलून धरली तर मुरलीधर मडावी माजी पं.स.सदस्य यांनी राशन दुकानदार व ग्राहकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला,व सामंजस्याने समाधान व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली.
या सभेला राशन दुकानदार, आणि काही निवडक ग्राहक आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

