ग्रंथामुळे जीवन समृध्द होण्यास मदत – पदमश्री नामदेव कांबळे

0
50

ग्रंथोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

· ग्रंथ दिंडीतून वाचन संस्कृतीचा जागर

· ग्रंथ प्रदर्शनातून वाचकांसाठी मेजवानी

उषा नाईक जिल्हा संपादिका, वाशिम : जीवन जगतांना श्रध्दा असणे आवश्यक असते. श्रध्देने माणसाचे आयुष्य उन्नत होते. जीवन उन्नत आणि समृध्द करणारी दुसरी बाब म्हणजे आपली संस्‍कृती आहे. भारतीय कुटूंब व्यवस्था ही दिर्घकाळ टिकणारी असल्यामुळे या व्यवस्थेतून भारतीयांना आनंद व समाधान मिळत असते. माणूस घडविण्यात ग्रंथांची भूमिका महत्वाची असून ग्रंथांमुळे माणसांचे जीवन समृध्द होण्यास मदत होते. असे प्रतिपादन पदमश्री नामदेव कांबळे यांनी केले.
आज २० मार्च रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव -२०२४ च्या उदघाटन प्रसंगी कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे, विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रा.गजानन वाघ, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ.राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, नवल कव्हळे,नरेश काळे उपस्थिती होती.
कांबळे म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी जिल्ह्याच्या साहित्यिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याची आवश्यकता व्यक्त केली.ग्रंथोत्सवातून ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री या पुरतेच हे प्रदर्शन मर्यादित न राहता प्रत्येक घरी पुस्तके असली पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी जर ललीत साहित्याची पुस्तके उपलब्ध झाली तर घरातील लहान मुलांना देखील वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
जिल्हा ग्रंथोत्सवात जिल्हयातील साहित्यीकांचा सहभाग असला पाहिजे. त्यांची पुस्तके देखील या ग्रंथोत्सवात उपलब्ध झाली पाहिजे. जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयातून सामुहिक पुस्तके वाचनाची चळवळ निर्माण झाली पाहिजे. वाचनामुळे माणसाच्या क्षमता विकसीत होतात. वाचन समृध्द समाज निर्माण झाला तर नैतिक समाज निर्माण होण्यास मदत होईल. माणसाला तारुण नेण्याची क्षमता ग्रंथात आहे. प्रमाणिकपणे वाचन केले तर आपल्या विकासाला चालना मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वि.स. खांडेकर यांची ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त ययाती कादंबरी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राघववेळ हया शाळकरी दलित मुलांवर आधारीत कादंबरीचे, ना.सी.फडके व डार्वीन यांच्या जीवनावर थोडक्यात विश्लेषण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी घुगे म्हणाले,वाचन केले तर आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात वाचनामुळेच तारुण नेता येईल. ज्याप्रमाणे आपला पहिला गुरु आई आहे. तर दुसरे गुरु हे ग्रंथ आहेत. वाचनाने माणूस समृध्द होतो. वाचनामुळेच माणूस हा माणसाशी माणसाप्रमाणे वागतो. ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन पुस्तके बघितली पाहिजे. त्यातील काही पुस्तके खरीदी देखील केली पाहिजे. वाचन माणसाला कायम समृध्द बनवित असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. काळे म्हणाले, वाचन संस्कृतीला उतरती कळा लागली आहे. वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे. वाचन संस्कृती ही टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे यासाठी ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षेसाठी असलेली पुस्तकेच न वाचता ललीत साहित्याची देखील पुस्तके वाचली पाहिजे. अभ्यासापुरते वाचन मर्यादित न ठेवता ज्या पुस्तकातून ज्ञानात भर पडते व माहिती मिळते अशी पुस्तके वाचली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कातकडे यांनी ग्रंथोत्सव आयोजनामागची भूमिका विषद केली. प्रारंभी मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनात लावलेल्या पुस्तक विक्री स्टॉलचे फित कापून उदघाटन केले. दीपप्रज्वलन करुन एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पुजन केले. लोककलावंताच्या समुह संचासह कु. क्षितीजा लोंढे हिने स्वागत गीत सादर केले.
सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीचा शुभारंभ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आला. या ग्रंथ दिंडीमध्ये शहरातील बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होते. सहभागी विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीदरम्यान वाचन संस्कृतीच्या जागर करणाऱ्या घोषणा दिल्या. ही दिंडी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रमस्थळी पोहोचली.
उदघाटन कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात ग्रंथालयाचे योगदान, काव्यवाचन व त्यानंतर वाचाल तर वाचाल नाटीका उत्साहात सादरीकरण झाले.कार्यक्रमाला जिल्हयातील साहित्यीक, कवी, जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयाचे संचालक, जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, पत्रकार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनिल बळी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.गजानन घुगे यांनी मानले.
ग्रंथप्रदर्शनातून वाचकांसाठी खऱ्या अर्थाने मेजवानीच होती. विविध प्रकारच्या साहित्यप्रकारांचे पुस्तक प्रदर्शन, लेखकांच्या भेटीगाठी, चर्चासत्रे आणि ग्रंथसंस्कृतीचा उत्सव यामुळे वाचकांना भरभरून आनंद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here