मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनची व्यवस्थापन समितीची बैठक दिं.२३ मार्च २०२५ ला वीर सावरकर स्मारक, दादर पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आली.
या बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीत थ्रोबॉल प्रीमियर लीगच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रिमियर लीगच्या माध्यमातून राज्यभरातील खेळाडूंना संधी मिळावी आणि थ्रो बॉल हा खेळ अधिक लोकप्रिय व्हावा, यासाठी नियोजन करण्यात आले. या प्रिमियर लीगच्या आयोजनाचा अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र थ्रो बॉल असोशिएशन अध्यक्ष डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले की, “थ्रो बॉल हा खेळ राज्यात अधिक व्यापक प्रमाणात पोहोचावा आणि गडचिरोलीसारख्या अती दुर्गम भागातही या खेळाचा विकास व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.” तसेच, थ्रो बॉलच्या वाढीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला प्रामुख्याने असोशिएशनचे उपाध्यक्ष डॉ. राकेश तिवारी, उपाध्यक्ष अरुण हरडे, सचिव राहुल वाघमारे, संयुक्त सचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी, अमर भांडारवार, प्रियंका धुरी, तसेच सदस्य दीपक कदम, गजेंद्र जाधव, गणेश यादव आणि शिशिर हलदार उपस्थित होते.
थ्रो बॉल हा खेळ जलद गतीने खेळला जाणारा आणि संघभावना वाढवणारा खेळ आहे. भारतात विशेषतः शालेय व महाविद्यालयीन पातळीवर याचा प्रसार वाढत आहे. या खेळात फिटनेससोबतच खेळाडूंच्या सहकार्याच्या कौशल्यांचीही कसोटी लागते. याच कारणामुळे थ्रो बॉलच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनचे सातत्याने प्रयत्नशील आहे.
या बैठकीत ठरविण्यात आलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील थ्रोबॉलपटूंना नवीन संधी उपलब्ध होतील आणि हा खेळ भविष्यात अधिक लोकप्रिय होईल, असा विश्वास या असोशिएशन चे अध्यक्ष मा.खा.डॉ. अशोक नेते यांनी व्यक्त केले.

