क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव एकमताने संमत

0
99

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे व सर्व विधीमंडळ सदस्यांचे मानले आभार

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव सोमवार, दि. २४ मार्चला विधानसभेत एकमताने पारीत झाला.

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने संमत झाला. हा केवळ ठराव नाही, तर वंचितांच्या वेदनांना सन्मान, शिक्षणक्रांतीला सलाम आणि समतेच्या मूल्यांचा जयघोष आहे. हा जनतेचा आवाज आहे, अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशवासीयांच्या जनभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत या संदर्भात अशासकीय ठराव मांडला होता. या ठरावाला उत्तर देताना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भात पुढील आठवड्यात विधानसभेत ठराव संमत करणार असल्याची घोषणा केली होती. शिक्षण नावाचं अद्भुत अमृत ज्या महान व्यक्तिमत्वामुळे आपणा सर्वांना प्राशन करता आले, ते या भारतातील महान रत्न जगभरात ‛भारतरत्न’ म्हणून ओळखले जाणे आपल्यासाठी गौरवाची बाब ठरणार आहे, असं ते प्रस्ताव मांडताना म्हणाले होते. त्यानंतर आज, सोमवार, दि. २४ मार्चला विधानसभेत एकमताने ठराव मंजूर झाला आहे. हा ठराव विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे.

ऐतिहासिक क्षण
विधानसभेत एकमताने ठराव मंजूर होणे हा जनभावनेचा सन्मान करणारा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना उजाळा देणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या ठरावामागे संपूर्ण महाराष्ट्राची सामूहिक इच्छाशक्ती आहे. हा निर्णय जनभावनेचा सन्मान करणारा क्षण आहे,’ अशी प्रतिक्रिया आ.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

फुले दाम्पत्याचे योगदान
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी आणि दलित-वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडून दिली, ती त्या काळातील अभूतपूर्व क्रांती होती. पुण्यात सुरू झालेली मुलींची पहिली शाळा हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर समतेच्या प्रवासाचे पहिले पाऊल होते. आज महिलांनी देशाच्या प्रत्येक क्षेत्रात केलेल्या यशस्वी वाटचालीमागे फुलेंच्या शिक्षणविषयक दृष्टीकोनाची मोठी भूमिका आहे. त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आजच्या आधुनिक भारतात स्त्रीशक्तीच्या प्रगतीचा पाया ठरली आहे, असे आ. मुनगंटीवार म्हणाले.

सातत्याने पाठपुरावा
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने आणि प्रभावीपणे संसदीय संघर्ष करत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला. त्यांच्या प्रयत्नांमुळे फुले यांचे वारसदार शासकीय नोकरीस पात्र ठरले. तसेच, पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे गौरवपूर्ण नाव देण्यात मोलाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here