माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
“भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना” कार्यक्रमाने भरली समाजप्रबोधनाची सरिता
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी – तालुक्यातील चौगान येथे फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच तथा बौद्ध समाज चौगान यांच्या वतीने “भीम जन्मोत्सव – उत्सव समतेचा” या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध गायक सुशांत मानकर आणि त्यांच्या संच यांनी सादर केलेल्या “भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना” या बुद्ध-भीम गीतांच्या प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. समाजप्रबोधन, समता आणि बंधुभावाचे सूर कार्यक्रमात भरभरून अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सह-उद्घाटक म्हणून चौगानचे सरपंच उमेश धोटे, अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रा. अंकुश मातेरे, तर उपाध्यक्ष म्हणून पत्रकार प्रा. संतोष पिलारे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुद्धोधन शिवणकर, राजेंद्र गुणशेट्टीवार (प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान), सामाजिक कार्यकर्ता सुरज शिवणकर, मिनाक्षिताई शिवणकर, मायाताई चहांदे, मधुकर राऊत (अध्यक्ष तंटा मुक्ती समिती), डी.आर.एक्स. केतन लिंगायत, दिक्षाताई लिंगायत, अखिल फुलकांबळे (अध्यक्ष बौद्ध समाज चौगान), रंजुबाई मेश्राम, अरुणजी गेडाम, योगेश मैंद, कमलेश मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी आपल्या भाषणात प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकताना सांगितले की, “बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. मात्र त्यांचे शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नव्हते, तर समाज परिवर्तनासाठी होते. त्यांच्या विचारांमध्ये आजही आपल्याला दिशा देण्याची ताकद आहे.” शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसून, ते विचार करण्याची ताकद देतं, अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवतं. म्हणून शिक्षण घ्या – पण स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता, समाजाच्या उन्नतीसाठी ते वापरा. नोकरी मिळवणं हे जरी महत्त्वाचं असलं, तरी स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार देणं हे अधिक प्रेरणादायक आहे. व्यवसायातून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मयुर शिवणकर यांनी केले. चौगान ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, बौद्ध समाज आणि रमाई महिला मंडळ चौगान यांच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

