आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी शेंद्राची मानकरी श्री. गुरु यमुनामाय यांचे उत्साहात स्वागत.

0
78

यमुनामाय यांनी यात्रेतील आयोजनाचे केले कौतुक.

शेंद्राची मानकरी श्री गुरु यमुनामाय यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नीने श्री गुरु यमुनामाय यांचे मनःपूर्वक स्वागत केले. अम्मा का टिफिन आणि श्री माता महाकालीची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही चैत्र महिन्यात महाकाली मंदिर परिसरात आयोजित यात्रेत नांदेड जिल्ह्यातून श्री गुरु यमुनामाय यांचे अश्वारूढ होऊन आगमन झाले. यावर्षीही त्यांनी आपल्या उपस्थितीने यात्रेला आध्यात्मिक तेज प्राप्त करून दिले. राजमाता निवासस्थानी झालेल्या भेटीत श्री गुरु यमुनामाय यांनी यात्रेकरूंसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधा – स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नछत्र, आरोग्य व्यवस्था आणि संपूर्ण नियोजनाबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. त्यांनी आयोजकांचा सेवाभाव आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मनापासून प्रशंसा केली. गेल्या वर्षी झालेल्या यात्रेदरम्यान श्री गुरु यमुनामाय यांनी स्वर्गीय अम्मा यांची भेट घेतली होती. यंदा अम्मा आपल्यात नसल्याची बाब समजताच त्यांनी अम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत भावूक करणारा ठरला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, महाकाली यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक आहे. श्री गुरु यमुनामाय यांचे चंद्रपूरमध्ये आगमन हे आपल्या सर्वांसाठी गौरवाचे आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या साक्षात दर्शनाने यात्रेला नवी उंची मिळाली आहे.
स्वर्गीय अम्मा यांनी आयुष्यभर सेवा, समर्पण आणि भक्तीचा आदर्श ठेवला. त्यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणा देत आहे. यंदाच्या यात्रेत त्या नसल्या तरी त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात कायम आहे. येत्या काळात ही यात्रा आणखी भव्य, सुसंघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
श्री गुरु यमुनामाय म्हणाल्या की, पुढील वर्षी महाकाली यात्रेत भाविकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास आहे. येथे शिस्त, सेवा आणि श्रद्धेचा संगम आहे. त्यामुळे देवतेच्या कृपेने यात्रेचा विस्तार आणि प्रभाव नक्कीच वाढेल असे त्या म्हणाल्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here