शाळेसमोर तळे होते
तळ्यामध्ये डास च डास
दुर्गंध होता सगळीकडे
पाण्याचाही रंग काळा
माझी पण एक होती शाळा….ll१ll
अंगावरती मळके कपडे
बंद दप्तराचे सुटले
चप्पल एकच तुटलेली,
शिवली चार वेळा
माझी पण एक होती शाळा….ll२ll
रंग उडाल्या भिंती
डुग डुगणारे बेंच
गळणारे छप्पर आणि
तडा गेलेला फळा
माझी पण एक होती शाळा….ll३ll
इंग्लिश गणित मराठी
भूगोल आणि हिंदी
शिक्षिका होत्या चार,
विषय मात्र सोळा
माझी पण एक होती शाळा….ll४ll
दुपारच्या सुट्टीत जेवण
बाई द्यायच्या सर्वांना
जेवणाला रोजचीच खिचडी,
खिचडीत सर्व अळ्याच अळ्या
माझी पण एक होती शाळा….ll५ll
गणिताच्या आमच्या जोशीबाई
मन लावून शिकवायच्या
समजल नाही कोणाला,
तर समजवायच्या दहा वेळा
माझी पण एक होती शाळा….ll६ll
इंग्लिश मधले एबीसीडी
स्पेलिंग आणि ग्रामर
घरी आईशी इंग्लिश मध्ये,
बोलण्याचा लागला चाळा
माझी पण एक होती शाळा….ll७ll
15 ऑगस्ट , 26 जानेवारी
पाहुणे यायचे भारी
मिठाई द्यायचे सगळ्यांना
एकाच दिवसाचा आनंद मेळा
माझी पण एक होती शाळा….ll८ll
लाईट माझ्या घरी नव्हते
पण अभ्यास माझ्या आवडीचा.
शाळेमधल्या दिव्याखालीच,
अभ्यास केला सगळा..
माझी पण एक होती शाळा….ll९ll
सगळ्या विषयात नंबर पहिला
हेड बाई नेहमीच खुश
पाठीवरती हात ठेवून
म्हणायच्या तू सर्वाहून वेगळा..
माझी पण एक होती शाळा….ll१०ll
शिकता शिकता दहावी आली
अभ्यास केला सगळा
80% मार्क मिळाले
पेपर मध्ये फोटो आला
माझी पण एक होती शाळा….ll११ll
खिशामध्ये पैसे नव्हते
घरामध्ये उपासमार
शिक्षण करू की नोकरी
गोंधळ मनाचा झाला
माझी पण एक होती शाळा….ll१२ll
आले शिक्षक मदतीला
म्हणाले तू शिक मुला
शिकून खूप मोठा हो
अभिमान वाटेल आम्हाला
माझी पण एक होती शाळा….ll१३ll
आई शेतात, बाबा रिक्षावर
भावाची ही साथ सोबतीला
दिवस-रात्र मेहनत केली
पोहोचलो आय.ए.एस. पदाला
माझी पण एक होती शाळा….ll१४ll
खूप वर्षांनी गावी गेलो
पाय वळले शाळेकडे
शाळा मात्र दिसत नव्हती
कंठ माझा दाटून आला
माझी पण एक होती शाळा….ll१५ll
उंचच उंच इमारत होती
शाळेच्याच जागेवर
शाळेभोवती गाड्याच गाड्या
श्रीमंतांचा सोहळा..
माझी पण एक होती शाळा….ll१६ll
हात ठेवला कुणीतरी
म्हणून वळलो मागुती
हेड बाई समोर उभ्या
म्हणाल्या, “सगळं संपलंय बाळा..”
माझी पण एक होती शाळा….ll१७ll
पण खरंच सांगतो मित्रांनो,
जरी विश्वास नाही ठेवला,
तरी ओरडून सांगेन जगाला..
इथे होती एक पाखरांची शाळा…
माझी पण एक होती शाळा..
माझी पण एक होती शाळा….ll१८ll
कवी अमोल निरगुडे
ठाणे

