नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सोनार समाजातील उपवर मुला मुलींच्या पालकांनी विवाहनिश्चिती करताना तसेच आपल्या उपवर मुला मुलींचे विवाह झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, यासंदर्भात विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहोत्तर समुपदेशन यांचा लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजातील घटस्फोट प्रमाण कमी होऊ शकते, असे आवाहन सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केले आहे.
ते पुढे म्हणतात की, उपवर मुलाचे पालक आणि उपवर मुलीचे पालक यांनी आपल्या मुला मुलीची पसंती झाल्यानंतर विवाह निश्चिती करतेवेळी स्थानिक नोंदणीकृत सोनार समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देखील बोलविले पाहिजे. संबंधित पदाधिकाऱ्यांनीदेखील दोन्ही पालक आणि संबंधित उपवर मुलगा, उपवर मुलगी यांना कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी, विवाह का महत्त्वपूर्ण आहे, याची माहिती देऊन हा विवाह निश्चित करणार, हे नक्की आहे काय? तसे असेल तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट घेणार नाहीत की परस्परांपासून विभक्त होणार नाहीत. दोन्हीकडचे नातेसंबंध वृद्धिंगत करू, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले पाहिजे. हे प्रतिज्ञापत्र आम्ही स्वेच्छेने देत आहोत, असेही त्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट नमूद केले पाहिजे.
त्यानंतर विवाहसोहळा पार पडताच दुसरे दिवशी लग्नपत्रिका आणि सदर प्रतिज्ञापत्राची सत्यप्रत नजीकचे विवाहनोंदणी कार्यालयात जाऊन विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) साठी अर्ज देताना सोबत जोडले पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.
संतती असलेली विवाहिता विभक्त होऊ पाहत असेल, तर त्यामागील कारणमीमांसा सुजाण नातेवाईकांनी जाणून घेतली पाहिजे. त्यातील बहुतांश कारणे क्षुल्लक असतील किंवा पती पत्नी दोघांचेही समुपदेशन केल्याने, तिचे तसेच तिच्या पतीचे समाधान होत असेल, तर विभक्त होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
शक्यतो विवाहनिश्चिती करण्यापूर्वी, म्हणजेच उपवर मुला मुलीची पसंती झाल्यानंतर दोघांचेही विवाहपूर्व समुपदेशन करणे आवश्यक आहे. त्यात संसारात उद्भवणाऱ्या संभाव्य कुरबुरी आणि त्यांची कारणे, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना विश्वासात घेऊन नवविवाहितेने आपल्यातील काही कमतरता असेल, तर पतीच्या समक्ष मला आई आणि वडिलांच्या मायेने समजावून सांगावे, म्हणजे मला आपल्या घरात समरस होताना अडचणी येणार नाहीत असे सांगितले, तर निश्चितच नवदाम्पाच्याचा संसार सुखेनैव होऊ शकतो, असे सुचवावेसे वाटते.

