प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अनुराग नाट्य मंडळ वडसा निर्मित, जयवंत दळवी लिखित, भास्कर पिंपळे दिग्दर्शित, ‘लावणी भूलली अभंगाला’ या पेशवेकालीन नाटकाचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनात नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात अभंग श्रेष्ठ की लावणी श्रेष्ठ? या विषयावरील हा प्रवेश सादर करण्यात आला. झाडीपट्टी रंगभूमीवर प्रामुख्याने मागील तीस वर्षापासून संगीत नाटकांचे प्रयोग करणारे स्वरबहार भास्कर पिंपळे यांच्या अनुराग नाट्य संपदा मंडळाने संगीताची मेजवानी रसिकांना दिलेली आहे.
या पेशवेकालीन नाटकातील प्रतिनिधी हे सात्विक व प्रांजळ स्वभावाचे, ख्याल, टप्पा, ठुमरी, अभंग यांचे भोक्ते रसिक होते. त्यांच्याच वाड्यातील मुनीम पंत मात्र प्रतिनिधी हे वाईट मार्गाला लागावे, तमाशाच्या फडाच्या अधीन व्हावे,म्हणून वाड्यात तमाशाचा फड उभा करतो. प्रतिनिधी मधील बदलामुळे व तमाशा मुळे सरस्वती ही घर सोडून जाते स्वार्थापाई पंत प्रतिनिधींची दिशाभूल करतात.शाहीर प्रभाकर हे पेशवेकालीन नावाजलेले शाहीर होते. त्यांना लावणी काव्याचा प्रचंड अभिमान होता. अभंगपेक्षाही लावणी श्रेष्ठ असल्याचा कांगावा त्यांनी केला. शाहीर प्रभाकर यांचे ”जडण घडण काव्याची न्यारी, शब्द शब्द चमकतो हिरा, प्रभाकराचे कवण अमोलिक शिरी जसा चमकतो हीरा’ व ‘ बहार हा आला रात्री मोतीया फुलला’स्वरभार भास्कर पिंपळे यांनी गायलेल्या या सुमधुर गायनास चांगलीच दाद मिळाली. तर संत निळोबा यांच्या ‘प्रेम रंगी रंगता, आनंद पसरे दशदिशा’,’दौलत जादा वरी ना अभंग नाचला, सत्तेवरती नाही माथा त्याने नमविला” या स्वरबहार दिवाकर बारसागडे यांच्या गायनाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाला. दोघांची जुगलबंदी चांगलीच रंगली. शाहीर प्रभाकर च्या अहंकाराला निळोबा यांनी अभंगाद्वारे प्रत्युत्तर दिले.संत निळोबाच्या अभंगवाणीपुढे शेवटी शाहीर प्रभाकर यांना हार मानावी लागली. शाहिराची प्रेयसी गंगा दिसायला सुंदर, देखणी होती. तिच्या सौंदर्यावर प्रांताचे राजे प्रतिनिधीही फिदा झाले होते. सात्विक, आध्यात्मिक आशयाच्या संत निळोबाच्या अभंगवाणीपुढे जुगलबंदीत लावणीकडून ती सुद्धा नकळत,’ आजवरी नाचले गाऊनी गीते लाख सवंग, वाटतो गावा एक अभंग या भैरवी,अभंगाच्या तालावर नाचू लागली .हे बघून प्रभाकरांचा पारा आणखीनच प्रचंड चढला. शेवटी निळोबाच्या अभंगाचा विजय झाला . संत निळोबांच्या आध्यात्मिक शिकवणीपुढे शाहीर प्रभाकरसुद्धा नतमस्तक झाले आणि लावणी अभंगाची धाकटी बहीण असल्याचे त्यांनीही मान्य केले. अर्थातच संत निळोबाच्या थोरवी पुढे व अभंगाच्या शिकवणीमुळे प्रतिनिधी सावध होतात आणि वाईट कार्यापासून परावृत्त होतात. लावणीच्या रंगेल तामसिकतेकडून अभंगाच्या सात्विकतेकडे होणारे मार्गक्रमण दर्शविणारे हे नाटक आहे.
स्वरबहार भास्कर पिंपळे यांच्या बुलंद पहाडी स्वराने शाहीर प्रभाकर यांची भूमिका उत्तमरीत्या साकारत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर तेवढ्याच ताकदीने प्रतिउत्तर देत संत निळोबाची भूमिका स्वरबहार दिवाकर बारसागडे यांनीही अभंगाच्या गायनाद्वारे वटविली. शाहीर प्रभाकर व निळोबा यांच्या एकावर एक पुरातन काळातील सवाल जवाब व काव्यमय स्वरातील गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाला होता. नाट रसिकाची संगीताची भूक भागविण्यात दोघांनाही यश मिळाले. भवान्या व गणपा यांच्यातील विनोद प्रसंगामुळे प्रयोगात रंजकताही आली.शाहीर प्रभाकर -भास्कर पिंपळे,निळोबा – दिवाकर बारसागडे,पंत – सुरेश लंजे,प्रतिनिधी -अंकुश पेटकर, भवान्या -लुकेश फुलबांधे, गणपा – फुलबांधे गुरुजी,गंगा – वर्षा गुप्ते या कलावंतांचा कसदार अभिनय, हार्मोनियम – प्रल्हाद मेश्राम, तबला – केवळ बगमारे यांच्या संगीत साथीमुळे प्रयोग चांगलाच रंगला.अर्थातच लावणी आणि अभंगाची जुगलबंदी या नाटकात दर्शविलेली असून शेवटी अध्यात्म हाच खरा मानवी जीवनाचा अंग आहे, हे या नाटकाद्वारे स्पष्ट होते.
प्रा. राजकुमार मुसणे

