तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शासनाकडून आयोजित सस्ती अदालत कार्यक्रमात शेतकरी सर्वसामान्य नागरिकांनी आपली प्रकरणे ठेवून जागेवरच निपटारा करून घेण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
सामान्य शेतक-यांना अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी पंधरा दिवसातून एकदा एका ठिकाणी शक्यतो तहसिल कार्यालयात किंवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी ” सस्ती अदालत” या नावाने छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये सस्ती अदालत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने परिपत्रक दिनांक 16.04.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने, माहूर तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. “तहसिलदार”किशोर यादव या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी तहसिल कार्यालय अथवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी “सस्ती अदालत” आयोजीत करण्यात येणार आहे. सदर अदालत मध्ये संबंधित नागरीक यांचे शेतरस्ता/पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबतची प्रकरणे या बाबत सर्व संबंधीत शेतकरी यांचेसोबत चर्चा करुन तसेच समुपदेशन करुन सामंजस्याने निकाली काढणे बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक 09/05/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पहिली “सस्ती अदालत” सर्व मंडळ स्तरावर आयोजित केली आहे तसेच दर महिण्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी मंडळ मुख्यालयी “सस्ती अदालत” चे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व नागरिकासह शेतकऱ्यांनी या सस्ती अदालत कार्यक्रमात सहभागी होऊन आपापली प्रकरण निकाली काढून घ्यावीत असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.

