prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – श्रावण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – श्रावण

0
106

‘श्रावण आला पाऊसासवे
बहरली नवचैतन्याची लाट
प्रसन्न मधुर वातावरणात
उजळली भक्तिमय पहाट’

पावसाळा नवचैतन्यांनी भरलेला ऋतू, सर्वत्र हिरवळ जणू निसर्ग हिरव्या सौंदर्याने नटल्यासारखं वाटतं, नदी- नाले तुडुंब भरलेले, सगळं शिवार पाऊसाने धुऊन काढलेलं असतं. अलगद येणाऱ्या पाउसानेही मनातील काजळी,मरगळ दूर होऊन एक शांत, शितल वातावरणाची अनुभूती येते. निळ्याशार आकाशात काळ्या ढगांनी व्यापलेलं आच्छादन,विजेचा लखलखाट आणि भूतलावरील वाऱ्याचे झोत, पक्ष्यांचा किलबिलाट आणि दरवळलेला मृदगंध मनाला उत्साह देतो.टपोऱ्या थेंबांनी येणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर पडतात आणि हिरवे रूप न्हालेल्या श्रावणाच्या आगमनाने आयुष्यात आनंद निर्माण होतो.
श्रावण म्हणजे निसर्ग उत्सव, वातावरणात हिरव्या रंगाची मुक्त उधळण डोळ्यांनाच नाही तर आत्म्यालाही प्रसन्नता देते. ‘श्रावण म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा मास’ वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन सात्विकतेने जगायला शिकविणारा, भक्तिमय वातावरण निर्माण करणारा असे महात्म्य श्रावण महिन्याचे आहे. अनेक सण आणि उत्सवाची रेलचेल, उत्सवानिमित्ताने बनविले जाणारे विविध खाद्यपदार्थ मनाला तृप्ती देऊन जातात,आरोग्यमय असणारा श्रावण खरोखरच आयुष्याला नव संजीवनी देऊन जातो.

‘व्यस्त आयुष्यात
श्रावणाची साथ
सात्विक मनाची
क्रोधावर मात ‘

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकच ऋतू खास असला तरी श्रावण महिन्यात भक्ती आणि निसर्गाचा संगम बघायला मिळते.श्रावण निसर्गावर प्रेम करणं शिकवितो, एक आपुलकीचं नातं निसर्गाशी व्यक्तीचं निर्माण होतो. ‘श्रावण म्हणजे शांती,संयम आणि स्वच्छता’फक्त शरीराचीच नव्हे तर मनाचीही शुद्धता करण्याचा हा काळ असतो.धावपळीच्या जीवनात श्रावण आपल्याला परंपरागत सभ्य चालीरीती शिकवितो,नवीन आदर्श नव्या पिढीसमोर निर्माण होतो आणि आजच्या पिढीसाठी श्रावणाचं महत्त्व समजून घेणे किंवा मोठ्यानेही समजवून सांगणे अगत्याचं आहे. श्रावण हा फक्त एक महिना नाही तो नवचैतन्याचा अनुभव आहे.

डॉ.स्मिता गजभिये/तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here