
‘गणपती’ ज्यांना अडथळे दूर करणारा, बुद्धीची देवता, स्वामी म्हणून पूज्य मानले जाते. भगवान गणेश हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. पार्वतीने आपल्या शरीरावरील मातीपासून गणेशाची निर्मिती केली. देवी पार्वती स्नान करत असताना तिचे रक्षण करण्यासाठी त्याला जिवंत केलं. जेव्हा शिव परत आले तेव्हा त्यांना दाराशी गणेश आढळला, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात गणेशाचे डोके कापले. दुःखी पार्वतीने गणेशाला जिवंत करण्याचा आग्रह केला तेव्हा शिवाने गणेशाच्या शरीरावर हत्तीचे डोके बसविले. पार्वतीने तिच्या मुलाला मृत पाहिले तेव्हा ती दुःखी आणि संतप्त झाली. तिला शांत करण्यासाठी शिवाने मुलाला परत आणण्याचे वचन दिले. त्याने आपल्या अनुयायांना पाहिलेल्या पहिल्या सजीव प्राण्याचे डोके शोधण्याची सूचना केली, जे संयोगाने हत्ती होते. हत्तीचे डोके गणेशाच्या शरीरावर ठेवण्यात आले. ज्यामुळे तो जिवंत झाला. श्री ‘गणरायाचे आगमन’ म्हणजे हिंदू धर्मातील प्रिय हत्तीच्या डोक्याची देवता. या दैवी कृतीने हिंदू देवतांमध्ये त्याचे आगमन एक प्रमुख देवता म्हणून चिन्हांकित केले आहे.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात चतुर्थीला गणपतीची स्थापना करण्यात येते. श्री ‘गणरायाचे आगमन’ हे गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान त्यांचे प्रतिकात्मक आगमन आहे. लोक भक्ती, संगीत, उत्सवासह गणेश मूर्ती घरी आणतात. यालाच ‘गणरायाचे आगमन’ म्हणतात. मूर्ती परंपरेनुसार दीड, पाच, सात, किंवा दहा दिवस राहते. असे मानले जाते की गणेश भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी गणपती घरी येतात. शेवटी मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. गणपतीचे विसर्जन जे त्यांचे निवासस्थान कैलास पर्वतावर परतण्याचे प्रतीक मानले जाते.
हिंदू जणांचा गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो, ह्या उत्साहात स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारे काही बौद्ध आपल्या कुटुंबासह आनंद लुटत असतात. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि सांगितले आता तुमची जबाबदारी वाढली आहे. आता तुम्हाला धम्माचे पालन करावे लागणार आहे. यातून तुम्ही तुमची प्रगती करावयाची आहे. नुकतीच जागतिक किर्तीचे धम्मगुरु महास्थवीर संघरक्षित यांची जन्मशताब्दी साजरी झाली आहे. ते म्हणतात सर्वच बौद्धजन पूर्णपणे बौद्धच बनतील. सर्वच जण बौद्ध धम्माचे काही ना काही आचरण करणारे असतील, त्यामुळे हिंदू धर्माच्या प्रभावाखाली जाऊ शकेल असा आचरणहीन बौद्ध समाज शिल्लक राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हा धोका स्पष्टपणे दिसत होता म्हणूनच ते आपल्या अनुयायांना केवळ त्रिशरण आणि पंचशील देऊन थांबले नाहित, तर त्याचबरोबर त्यांनी बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिल्या, त्यामध्ये तीन नंबरची प्रतिज्ञा होती ‘मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही’ या विज्ञानवादी प्रतिज्ञा सीमित ठेवून भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या बाजूला गणपती व अन्य देव देवतांचे फोटो सजविलेले भारतात पाहायला मिळतात. हे असे प्रकार थांबले पाहिजेत. या बावीस प्रतिज्ञाच्या आचरणामुळे सामान्य बौद्ध समाज पुन्हा हिंदू धर्माच्या प्रभावाखाली जाण्याचे टाळू शकेल. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितले होते की हा धम्म वाटतो तेवढा आचरण करण्यास सोपा नाही. त्यासाठी तुमच्या बुरसटलेल्या रूढी परंपरा सोडाव्या लागतील. तुमच्या जीवन पद्धतीत बदल करावा लागेल. आपण विचाराने आणि आचरणाने बौद्ध झालो पाहिजे.
हती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धम्माचेही प्रतिक आहे आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली. उंदराची किंवा बैलाची मान लावली नाही. जगामध्ये दुःख आहे हे सांगणारे सर्वांत पहिले बुद्ध होते. दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सागितले. प्राचीन भारतात भगवान बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते, हे भगवान बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्यांनी अष्टांग मार्गाचे पालन केले ते दुःखापासून मुक्त होऊन कायमचे सुखी झाले. म्हणजेच दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता असे म्हणतात. ब्राम्हण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हटले आहे. बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ अंगाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे. मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुःखहर्ता होऊ शकत नाही. काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करुन दुःख नष्ट होत नाही. आठ मार्गाचा नायक महणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत. गणपती हा दूसरा तीसरा कोणी नसून बुद्धच आहे. लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाहीमध्ये गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत.
मोर्या या शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे. मौर्य हे नाव चंद्रगुप्त मौर्यशी संबंधित आहे. महाराष्ट्रात मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचा अपभ्रंश आहे. संत तुकाराम महाराज यांचे आडनाव मोरे होते. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असे इतिहासात नमूद आहे. शिवनेरी किल्ल्याच्या आजुबाजूला चौऱ्यांशी लेण्या आहेत. त्या सर्व बौद्ध लेण्या आहेत. जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले आहे. काही इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा जन्म लेण्यात झाल्याचे म्हटले आहे. हे मात्र सत्य वाटते. त्यांचा प्रथम राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. तो ब्राम्हणांनी शूद्र म्हणून नाकारला होता. शिवाजी महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने केला. शाक्त पद्धत ही बौद्ध पद्धत आहे. यावरून शिवाजी महाराजांचा बौद्ध धम्माशी संबंध दिसतो. शिवाजी महाराजांच्या कार्यावरून त्यांना सम्राट अशोकाचा इतिहास माहित असावा असे वाटते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी महात्मा फुलेंनी 1870 साली शिवजयंती सुरु केली. जी पहिली शिवजयंती होती. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. शिवजयंतीस बहुजन लोक भरभरून सामिल होऊ लागले. बहुजन समाज जागृत होत आहे आणि ब्राह्मणाचे महत्व कमी होत असल्याचे पाहून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली. बहुजन समाजात संभ्रम निर्माण होऊन शिवजयंती मागे पडत गेली, आणि गणेश उत्सव वाढत गेला.
या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले, त्याच गणपती शब्दाचे ब्राम्हणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राम्हण धन दौलत मिळवतात. प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो. म्हणून अशा वेळी बावीस प्रतिज्ञाचे वाचन केले पाहिजे. आणि तेहतीस कोटी देवदेवतेला नाकारले पाहिजे. कुठलाही देव नवसाला पावत नाही. ती फक्त ह्यूमन सायकॉलॉजी आहे.
हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धम्माचेही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. प्राचीन भारत हा बौद्धमय होता. हा खरा इतिहास असा आहे. सम्राट अशोकाने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता. तरुणांनी आपल्या वस्ती मध्ये गणपतीच्या नावानं पोसली जाणारी अंधश्रद्धा आणि या दहा दिवसात स्टेजच्या मागे खेळला जाणारा जुगारी व्यवसाय कसा हद्दपार करता येईल हे पहावे. तसेच यापुढे गणपती आणि इतर देव देवतांच्या सोबत बाबासाहेबांचा फोटो लावून बाबासाहेबांची विटंबना करण्याची कोणत्याही बांडगुळ नेत्याची हिम्मत होणार नाही यासाठी दंड थोपटावे. एका वस्तुस्थितीचा कधीच विसर पडू देवू नका की आपण आज जे काही आहोत ते केवळ बाबासाहेबांच्या कष्टामुळे, फक्त त्यांच्यामुळे आपल्याला माणुसकी लाभली, नाहीतर जनावरापलीकडंच आपलं जीवन होत. म्हणूनच बाबासाहेबांच्या विचारांशी बेईमानी होईल असं वागू नका. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आपल्या वाड-वडिलांनी घराबाहेर फेकलेली अंधश्रध्देची जळमटे पुन्हा घरात घेवू नका. ढोल पथकात, डान्स पथकात सामील होऊ नका, अशी कामे आमची काही तरुणाई करताना दिसते. असे करत असताना त्यांच्यामध्ये वैचारिक जागृती अजिबात दिसून येत नाही. माणसाच्या शरीराला हत्तीचे डोके लावले त्याला जबाबदार राजकीय नेते प्लास्टिक सर्जरी म्हणतात, ते असाही प्रचार करतात की प्लास्टिक सर्जरी ही भारताची देण आहे. शरीराच्या मळापासून कोणतीही मूर्ती तयार होत नाही. तेवढा मळ कोणीही अंगावर ठेवत नाही. मुर्तीला हत्तीचे डोके बसविले पटण्यासारखं नाही. बाप मुलाला ओळखत नाही अस कधी होत नाही. अशा भाकड कथा रचून जनतेला लुटले जाते. म्हणून अशा थोतांडापासून बहुजन समाजाने सावध रहावे.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















