
अथांग असते स्त्री जीवन,
समुद्रापेक्षा किती तरी खोल.
समुद्र आणि स्त्री दोहोंमध्ये साम्य,
दोघांचे मन विशाल, अथांग, विस्तीर्ण.
सहवासात येणार्या प्रत्येकालाच,
त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारतात.
वर वर दिसतात दोघेही शांत,
पण त्यांच्या अंतरंगात काय सुरू आहे,
याचा कोणालाच लागत नाही थांग.
समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा,
हळूहळू धारण करतात रौद्ररूप,
किनारा सुद्धा त्यांना नाही अडवू शकत.
माणूस तर कितीक दूर दूर…
स्त्री ईश्वर निर्मित सुंदर कलाकृती.
नाजूक असली तरी कणखर, जिद्दी.
दुष्टांचा संहार कराया झाली आदिमाया,देवी दुर्गा, जगदंबा, महिषासुरमर्दिनी.
सर्व नात्यांच्या भूमिका पेलण्यास आहे समर्थ.
आता चूल आणि मूल इतकेच नाही क्षेत्र,
शिक्षिका,डॉक्टर, इंजिनिअर, राष्ट्रपती
आणि अवकाशही केले पादाक्रांत.
स्त्री आहे जननी,
पुरुषाचा जन्मही तिच्याच पोटी.
प्रत्येक यशस्वी पुरुषापाठी,
नेहमीच असते एक स्त्री.
तू घे भरारी आकाशी,
सूर तू, ताल तू ,आरोह तू ,अवरोह तू,
गीत तू,संगीत तू,अंदाज तू आवाज तू.
अथांग तू,अनंत तू,सागर तू,किनारा तू,
किनार्यावर आदळणार्या बेफाम लाटा तू.
दयेचा अथांग सागर तू .
सागरी किनारा म्हणजे भावनांना,
मोकळीक देण्याची हक्काची जागा.
तुझा किनारा तुझ्याच लाटा
तुला नव्याने खुणावत आहेत…
सौ. अंजली जोशी
चिंचवड















