
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस पक्षाकडून अंतिम क्षणी तिकीट नाकारल्याने अमोल वामनराव भानारकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली असून, आता या प्रभागात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
अवघे चार–पाच दिवसांचा प्रचार कालावधी शिल्लक असतानाही अमोल भानारकर यांनी घर ते घर संपर्क मोहीम सुरू केली आहे. रोज सकाळपासून उशिरापर्यंत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. प्रभागातील नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचाराला वेग देत आहे.
प्रभागातील गटारी, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरिक सुविधा यांसारखे मूळ प्रश्न त्यांनी मांडले असून हे प्रभावी मुद्दे मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. स्थानिक भागातील तरुण तसेच महिलांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती त्यांच्या प्रचार पथकाकडून देण्यात येत आहे.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असले तरी “विश्वास, विकास आणि संपर्क” या तीन सूत्रांवर आधारित भानारकर यांचा प्रचार आक्रमक होत असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या चिंतेत भर पडल्याचे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.
आता प्रभाग ७ ब मधील ही लढत कोणत्या दिशेने वळते, कोणता उमेदवार मतदारांच्या मनात घर करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















