
प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर: दिनांक: २८/११ – राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI), चंद्रपूरने आज शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस आणि संलग्न वस्तीगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शोषणाच्या गंभीर घटनांबाबत जिल्हा प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. NSUI ने या संस्थांवर ‘सदोष मनुष्यवधाचे (Culpable Homicide)’ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
NSUI चे जिल्हाध्यक्ष शफक शेख यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव याकूब पठान जी, आतिश दुपारे, इमरान शेख, रोहित, नावेद आणि अन्य NSUI चे सहकारी उपस्थित होते.
NSUI च्या प्रमुख मागण्या:
NSUI ने स्पष्ट केले आहे की, कोचिंग संस्थांकडून येणारे अवाजवी शैक्षणिक दडपण, अवैध फी वसुली आणि वस्तीगृहांमध्ये सुरक्षा (CCTV/वार्डन) व मानसिक समुपदेशनाचा (Counselling) संपूर्ण अभाव यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी NSUI ने खालील त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे:
SIT मार्फत चौकशी: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस आणि वस्तीगृहांच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती (SIT) स्थापन करावी.
सदोष मनुष्यवधाचे गुन्हे: ज्या संस्थांच्या हलगर्जीपणामुळे किंवा मानसिक छळामुळे (Mental Harassment) आत्महत्या झाल्या आहेत, त्यांच्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.
सुरक्षा आणि समुपदेशन: सर्व वस्तीगृहांमध्ये 24×7 सुरक्षा रक्षक, CCTV आणि शासकीय मानसिक समुपदेशकांची नियुक्ती बंधनकारक करावी.
आंदोलनाचा इशारा
जिल्हाध्यक्ष शफक शेख यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, “प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे तातडीने लक्ष न दिल्यास आणि आमच्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी NSUI चंद्रपूरच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल.”















