
सागर विषाचा प्राशन करुन
केली प्रवाहित अमृताची धार
अज्ञानातल्या पांथस्थ स्त्रीयांना
सावित्रीने दिला विद्येचा आधार.||१||
बंदिस्त व्यवस्थेवर वार करून
केली शिक्षणाची कवाडे खुली;
हजारो वर्षाच्या अज्ञानी अंधारात,
पेटविल्या अथांग ज्ञानाच्या चुली. ||२||
खुल्या आभाळाच्या छताखाली
मातीच्या पाटीवर अक्षरे गिरविली;
ज्ञानज्योती बनून सावित्रीमाईने,
समाजात शिक्षणाची चक्रे फिरविली .||३||
ज्ञानदानाच्या वाटेवर झेलली किती
दगड, धोंडे, चिखल, शेण,माती;
पचवून अपमानाचे घोट विषारी,
स्त्रीच्या जगण्याला मिळवून दिली गती.||४||
महिलांचं आयुष्य जाळणा-या
सतीप्रथेवर केले प्रहार घणाघाती;
बंद पाडली सारी ही दुष्ट व्यवस्था,
केल्या प्रज्वलित जगण्याच्या वाती. ||५||
हजारो पिढ्या घडविण्यासाठी
पणाला लावले आपले आयुष्य;
झेलून जीवनभर कित्येक वादळे,
उज्ज्वल केले स्त्रीजातींचे भविष्य .||६||
रुढी-परंपरेच्या कुजट पानांना
तूच लाविलीस ज्ञानाने कात्री;
नतमस्तक तुझ्यापुढे आम्ही,
धन्य आहेस फक्त तूच सावित्री… ||७||
रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर















