
पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!
जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील अतिक्रमण कारवाईचा प्रश्न चिघळला असून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी आज पंचायत समितीवर धडक मोर्चा काढत गटविकास अधिकाऱ्यांसमोर ग्राम पंचायतीकडून देण्यात आलेल्या अतिक्रमण नोटिसांची होळी करून संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, फेकरी गावातील सर्वे नंबर २ मध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपासून शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. या वस्तीत सर्व धर्मीय समाज बांधव राहत असून ही वस्ती अनेक वर्षांपासून स्थिर आहे. २०२० साली ग्रामपंचायतीकडून संबंधित रहिवाशांना नमुना ८/१२ भोगवटा उताऱ्यांचे वाटप देखील करण्यात आले होते.
तथापि, त्यानंतरही सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून अतिक्रमणाच्या नावाखाली वारंवार नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई राजकीय द्वेषातून होत असल्याचा ठपका देखील ग्रामस्थांनी प्रशासनावर ठेवला.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. “अतिक्रमण नोटिसा रद्द करा”, “घरकुल वाचवा”, “अन्याय बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांसमोर नोटिसा जाळून निषेध नोंदवला.
ग्रामस्थांनी अतिक्रमण कारवाई तातडीने थांबवून सर्व रहिवाशांना नियमानुकूल करून कायमस्वरूपी संरक्षण देण्याची मागणी केली.
यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही व योग्य ती चौकशी करून न्याय्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्यासह रुपेश साळुंके, संगीत खरे, प्रवीण आखाडे, बबन कांबळे, मिका गायकवाड तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात अतिक्रमणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















