prabodhini news logo
Home चंद्रपूर झाडीपट्टीच्या कक्षा रुंदावत देशाभिमान जागविणारे नाटक : धर्मवीर

झाडीपट्टीच्या कक्षा रुंदावत देशाभिमान जागविणारे नाटक : धर्मवीर

0
257

लेखक – प्रा. राजकुमार मुसणे,गडचिरोली

झाडीपट्टीतील शंकरपट आणि नाटक आयोजनाची परंपरा सर्वश्रुत आहे. सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथे साधारणतः १९७५ पासून ३० जानेवारीला दरवर्षी बैलांच्या जंगी इनामी शंकरपट आयोजनाची दीर्घ परंपरा आहे . त्यानिमित्य एकाच रात्री अनेक नाटकांचे आयोजन केले जाते. यावर्षी नखरेल नार नवऱ्याची, अग्निदिव्य आणि माजी सरपंच दत्तात्रय कवठे यांचे गुरुदेव नाट्य कला मंडळाचे गाजर्लावर यांच्या आवारात आयोजित सिद्धार्थ कोवलेच्या गायत्री रंगभूमी निर्मित, सिनेस्टार देवेंद्र दोडके दिग्दर्शित, पंकेश मडावी लिखित” धर्मवीर ” या नाटकाचा प्रयोग होता. डॉ. पवन कवठे यांचे संचालन, दत्तात्रय कवठे यांचे उत्तम नियोजन,नाटकाचा नाविन्यपूर्ण विषय, निवडक गाजलेल्या कलावतांचा संच आणि नाट्यप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत धर्मवीर नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या संपन्न झाला.
धर्मवीर हे नाटक भारत – पाक यांच्यातील संघर्षाचा व अधिकार प्रस्थापित करण्याच्या काश्मीर आझादी यावर आधारित आहे. आतंकवाद ,दहशतवाद,कटकारस्थान, सत्ता काबीज अन् प्रस्थापित करण्यासाठीची कुटनीती,सत्तापिपासू देशाचे वाटोळे करून स्वार्थ साधणारे फितूर,भ्रष्ट राजकारणी आणि याउलट प्रामाणिकपणाने , निष्ठेने देशसेवा करणारा शूरसैनिक हा विषय धर्मवीर या नाटकातून मांडलेला आहे. प्रामाणिक सेवा आणि कर्तव्यनिष्ठा हे तत्त्व अंगीकारणाऱ्या देशभक्तांच्या समर्पित जीवनाचे नाटक आहे.
देश रंगीला ‘ या देशभक्तीने सुरू झालेले हे नाटक आतंकवाद्यांच्या खातम्यांनी संपते.आतंकवाद्यांनी भारतातील लालकिल्ला, ताजमहाल, पहेलगाम यासारख्या अनेक ठिकाणी हल्ले करून निरपराधांचा बळी घेतला. शांतीचा पुरस्कार करणाऱ्या भारतात कट्टर स्वधर्माभिमानी मोरक्याच्या निर्देशाने अंधानुकरणामुळे प्रचंड दहशतीने आतंकवादी अराजकता निर्माण करण्याचा दु:स्वास करतात.अशा आतंकवाद्यांच्या कारवायांना प्रतिउत्तर देत देशाविषयीची निष्ठा प्रस्थापित करणारे धर्मवीर हे नाटक आहे .दहशत पसरवून निष्पाप देशवासियांचा नाहक बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांना दिलेले देशप्रेमाचे , देशाभिमानाचे अन् निष्ठेचे उत्तर म्हणजे हे नाटक आहे.भ्रष्ट राजकीय नेतृत्वामुळे देशाचे पोखरलेपण उघड करणारे हे नाटक आहे . देश वासियांच्या मनात जाज्वल्य देशभक्ती बिंबविण्याचे आणि व्यक्ती पेक्षाही धर्म आणि राष्ट्रभक्ती श्रेष्ठ असल्याचे दर्शविणारे नाटक म्हणजेच धर्मवीर होय.वजीरे आझम यांच्या हुकूमावर जिहादच्या नावाखाली दहशत माजविणारे, खून खराबीने हिंदुस्थानला बरबाद करण्याच्या मकसदेने पछाडलेले आतंकवादी आणि देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र धडपडणारा प्रामाणिक , राजकारणाच्या दबावाला न जुमानणारा तत्वनिष्ठ मेजर धर्मवीर यांच्या प्रेरणादायी जीवनाची कहाणी अधोरेखित करणारे हे नाटक आहे. नराधमांना शिक्षा देणारा शिक्षक भारत मातेचे रक्षण करणारा रक्षक आणि देशावर वाकडी नजर टाकणाऱ्यांचा भक्षक ही जीवनसूत्रे अहर्निश मनीमानसी बाळगत भारतीयांच्या कणाकणात संचाललेल्या धर्म आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत ठेवणारा, आतंकवाद चिरडवण्यासाठी संघर्षरत सुपुत्र म्हणजे मेजर धर्मवीर. धर्मवीर यांच्या कर्तव्यनिष्ठ शौर्यामुळे महामहीम राष्ट्रपतीच्याहस्ते परमवीर चक्र सन्मानाने सन्मानित करण्यात आले.शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत स्त्रियांवर शस्त्र न चालविणारा, बलात्कार करणाऱ्या अबला स्त्रीला नराधमाच्या तावडीतून सोडवून तिच्याशी विवाह करणारा ,लहान भावाला मुलाप्रमाणे वाढविणारा, लहान भावाचे प्रेम कमी होऊ नये म्हणून पत्नीच्या आग्रहामुळे जाणीवपूर्वक अपत्य न होऊ देणारा, देशप्रेमी, प्रामाणिक दूरदृष्टीचा निष्प्रूव्हवृत्तीचा जागल्या म्हणजेच धर्मवीर. किंबहुना दिशाहीन शेखरच्या मनात जागे झालेले देशाभिमान आणि प्रसंगी बापापेक्षाही देशाला महत्व देण्याचा नाटकातील प्रसंग अधिक भावणारा.आजच्या भ्रष्ट, स्वार्थी , स्वतःपुरता विचार करणाऱ्या संकुचित मनोवृत्तीच्या विदारक समकाळातील पिढीला देशाविषयीची निष्ठा धर्मवीर हे नाटक वाढवते.
इंटलीकेशन ब्युरोचा गोपनीय रिपोर्ट देणारा भ्रष्ट मंत्री सत्यप्रकाश, ब्ल्यूप्रिंटची फाईल प्राप्त करण्यासाठी आतंकवादयांचे विविध प्रयत्न , गळ्यातील ताईतमध्ये लपवलेला कॅमेरा, वेशांतर करून जासूस बनून माहिती प्राप्त करणारे हेर, त्यांच्या वेशांतराला बळी पडणारे भाबडे नागरिक आणि सतत दक्ष मेजर धर्मवीर अशा विविध प्रवृत्तींचे पात्रे नाटकात समुचितपणे उभी केली आहेत. पतीच्या बदल्याच्या भावनेने झपाटलेली महिला आतंकवादी, मुस्लिम मुलीवर प्रेम केल्यामुळे झालेला विवेकचा छळ, प्रसंगी सावधानतेने अमजदला समोर करून विरोधकांना चकमा देत विवेकची केलेली सुटका,भ्रष्ट राजकारणाचा मुलगा असूनही भ्रष्ट, स्वार्थी वडिलांचे देशविरोधी कृत्य पाहून त्यांचा धिक्कार करणारा आणि वडिलांवरच गोळी झाडण्यासाठी प्रवृत्त झालेला देशभक्त शेखर, देशप्रेमाने ओतप्रोत, निष्ठावान देशभक्त ,जागरूक सजगप्रहरी कट्टर देशभक्त मेजर राहुलकुमार धर्मवीर यांच्या सर्व मिसळीतून काश्मीर या प्रांतातील आजादी विषयीचे विविध पदर उलगडले जातात.

कर्तव्यदक्ष अधिकारी मेजर राहुलकुमार धर्मवीर (सिनेस्टार देवेंद्र दोडके), आपल्या जोहरचा बदला घेण्यासाठी, हिंदुस्थानला बरबाद करण्याच्या महत्वकांक्षेने मिशन ए आझाद काश्मीरच्या ध्यासाने अनेक निरपराधांना ठार करणारी, विविध वेश धारण करणारी काश्मिरी जिहादी नूरजहा नुसरत बेग (सिनेस्टार आसावरी तिडके), सत्तेच्या लालसेने हपापलेला, गृहमंत्री पद मिळण्यासाठी इमान बाजूला ठेवणारा, स्वार्थी, सत्तालोलुप गद्दार सत्यप्रकाश (सिनेस्टार नरेश गडेकर), राजकारणी मंत्री सत्यप्रकाश यांचा अय्याशी मुलगा (मुकेश गेडाम), वेशांतर करून गुप्तवार्ता आपल्या लोकांना पोहोचविणारा हेर अल्लाचा नेक बंदा म्हणणारा फकीर , गुरखा, फिल्म डायरेक्टर बलवान उंचपुरे (मयूर चन्ने), नेत्याचा पीए म्हणून काम करणारा परंतु मेजर धर्मवीरला राजकारणाची गुप्तवार्ता पोहोचवणार बबन्या (प्रा. लुकेश फुलबांधे), धर्माने मुस्लिम असूनही विवेकवर प्रेम करणारी,आपली कर्मभूमी भारत मानणारी, मराठी बोलणारी, अभिनय आणि शास्त्रीय संगीतात आवड असणारी मुस्कान (अंकिता चौधरी),धर्मवीरचा लहान भाऊ मुस्लिम मुस्कानवर प्रेम करणारा विवेक (स्वरबहार सचिन बघेले), मिशन यशस्वी करण्यासाठी आतंक फैलावणारा कट्टर आतंकवादी अजगर अली (प्रा. संतोष बारसागडे), सरफराज (सिद्धार्थ कोवले), गुप्त हिराचा पडदाफास करणारी शीला (अस्मिता नन्नावरे), अनाथ, नोकरीसाठी धडपडणारी, मेजर सोबतच्या लग्नानंतर मातृत्वाचा त्याग करणारी, दीर विवेकवर पुत्रवत प्रेम करणारी वत्सल गंगा (रूपाली ठाकरे) आदी पात्रांच्या समन्वयातून नाटक सादर होते. गंभीर विषय, उर्दू – हिंदी भाषेतील प्रभावी संवादलेखनामुळे नाटककार पंकेश मडावी यशस्वी ठरले.
गंभीर विषयावरील नाटकातही प्रेक्षक खुर्चीला खिळवून राहावा यासाठी नर्मविनोदाची रचना नाटकात आहे. तू दिला एकचा कलदार तू फिरशील दारोदार ,दाना, कण्या, धीर, चॅलेंज, झेंडूची फुले ,आंबा धंदे, काम, फार्म हाऊस, दिवस गेले, लाडकी बहीण योजना असा शाब्दिक विनोद प्रेक्षकांना हसवतो. तर जलवा, जिसका कोई नही होता, होऊ दे स्पर्श तुझा, क्रिश का गाना ,साजणी बेभान झालो ग, विठू माऊली, अनुरागाच्या, आई मंदिर ,तुझ्यावर प्रेम करतो यासारख्या विविध श्रवणीय गीतांमुळे नाटकात रंगत आली. शिवाय ऍक्टोपॅड जागेशवर आत्राम, ऑर्गान मंगेश पेंदोर , तबला आकाश मडावी यांची उत्तम संगीतसाथ आणि उत्तम मेश्राम व शुद्धोधन यांच्या प्रयोग सहाय्यामुळे प्रयोगात रंगत आली.प्रथम प्रयोग असल्याने पाठांतर व शिथिलता वगळता उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या कलावंतांचा निवडक संच, पात्रानूरूप वेशभूषा, साजेशे नेपथ्य, प्रसंग उभा करण्याच्या दिग्दर्शकाच्या कल्पकतेमुळे प्रयोग उत्तम झाला.वंदे मातरम्, पुत्र भारत मातेचा या सारखे नाटक यापूर्वी झाडीपट्टीत रसिकप्रिय होती. मधल्या काळात मात्र सामाजिक कौटुंबिक नाटकांना अधिक पसंती मिळू लागली. सीमावादामुळे देशातील एकता बळकट करण्यासाठी धर्मवीरसारख्या नाटकाची नितांत आवश्यकता आहे.धर्मवीरचा निर्धार, देशप्रेम आणि निष्ठा, सिनेस्टार देवेंद्र दोडके यांचा जबरदस्त अभिनय,आसावरी तिडके यांची उर्दू लहेजेतील प्रभावी संवादफेक व नरेश गडेकर यांची फटाकेबाजी अन् भारदस्त अभिनय, दुष्कृत्याविषयीचा सत्यप्रकाशला झालेला पश्चाताप, शेखरने भ्रष्ट वडिलांची केलेली कान उघडणी, धर्मवीर ची सामर्थ्यशक्ती व युक्ती,यासाठी हे नाटक अवश्य पाहायलाच हवे.कौटुंबिक हिंसा, अत्याचार, उदध्वस्त होणारे कुटुंब, गरीबी, दुःख, यातना ,स्वार्थ, छळ, अपमानाचा बदला, अश्लील विनोद या झाडीपट्टी नाटकाच्या पारंपारिक ढाच्याची कोंडी फोडत मातृभूमीवरील प्रेम वृद्धिगत करत देशाभिमान वाढविणारे नाटक म्हणजे धर्मवीर होय. पैशापेक्षाही प्रेमाने , शांतीनेच चांगले जगता येते.विविध भाषा, धर्म, जाती विविधतेतूनही एकतेने नटलेल्या भारताला भांडणे, वाद नको तर शांती हवी आहे. युद्ध नको तर बुद्ध हवा, हाच संदेश नाटककारांने या नाटकातून दिला आहे.एकंदरीत हिंदुस्थानात शांती हवी, युद्ध नको तर बुद्ध हवा ,हाच संदेश नाटककारांने दिला आहे.

प्रा. राजकुमार मुसणे, आष्टी,गडचिरोली
9423639532

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here