
रेशमी धुक्यात हरवलेली,
ती जुनी पाऊलवाट,
मनाच्या कोपऱ्यात आजही,
शोधते तिचा थाट…
कुठे हरवले ते दिवस,
अन कुठे हरवले ते खेळ,
धावपळीच्या आयुष्यात आता,
उरला नाही वेळ..
पावसाच्या पहिल्या सरीने,
माती पुन्हा एकदा दरवळते,
त्याच ओल्या वाटेवरची,
लहानपणची माया आठवते….
कधी सुखाच्या सावलीत,
तर कधी दुःखाच्या उन्हात,
ती पाऊलवाट चालताना,
हरवायचो आपण आपल्याच गुंफणात….
आता डांबरी रस्ते आले,
अन सिमेंटची झाली जंगले,
पण त्या मातीच्या वाटेवरचे,
पाय मात्र तिथेच रुतलेले….
वळणावळणाची ती वाट,
आता गवताने आहे झाकलेली,
पण काळजाच्या पानावर,
तिची ओळख मात्र कोरलेली….
कधीतरी निवांत वेळी,
त्या वाटेवरून पुन्हा फिरावं,
हरवलेल्या स्वतःलाच,
त्या आठवणीत पुन्हा भेटावं….
विसावलेल्या संध्याकाळी,
जेव्हा मन मागे वळून बघतं,
तेव्हा त्याच हरवलेल्या वाटेवर,
आपलं बालपण हसताना दिसतं…
पाऊलखुणा त्याच आहेत,
फक्त रस्ता बदलला आहे,
आठवणींचा तो ठेवा,
आजही मनात साठलेला आहे…
सौ.अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















