
लेखिका
संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ
नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड नजीकच्या पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीनंतर भीषण अपघात. ही बातमी पेपरमध्ये वाचताच पायाखालची जमीन सरकली. तसेच समस्त वाचकांचे डोळे पानावले. या खाजगी बसमधील प्रवाशासहित विविध स्वप्ने घेऊन प्रवासाला निघालेल्या अनेक तरुणांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न आगीत होरपडून गेले .खरंच किती भयावह ही घटना .आणि याच ट्रॅव्हल्स मधून आमची मुलं सुद्धा पुण्याला ट्रॅव्हल्स मधून प्रवास करतात . जास्तीत जास्त मुलं मुली उच्च शिक्षण घेण्यासाठी ,कोणी जॉब करण्यासाठी तर कोणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठे स्वप्न घेऊन मोठ्या शहरामध्ये मध्ये जातात. त्यामुळे मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे खाजगी ट्रॅव्हल्स मधून नेहमीच येणे जाणे असते .मात्र हा अपघात झाल्यानंतर प्रवास करणाऱ्या मुलांना धक्काच बसला.तसेच सर्वच पालकांना आता मुलांची काळजी वाटू लागली .प्रवास करायचा तर कसा आणि कशाने ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.कारण त्याच बस मधील मुलांचा अपघात झाला. आणि त्यांच्या पालकांना आणि जवळच्या नातेवाईकांना कायम दुःख देऊन गेले.यात विविध स्वपने घेऊन प्रवासाला निघालेल्या मुलांच्या स्वप्नांचा कोळसा झाला .या प्रवाशांचा काळ आणि वेळही आली असेल असे म्हटले जाते .पण तो काळ आणि वेळ वाहनचालकांच्या चुकीमुळे आली ही सत्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.मात्र आता असेच ट्रॅव्हल्सचे अपघात होत राहिले तर विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी काय करावे बरे.सर्वच पालकांची चिंता वाढलेली आहे.प्रत्येकाचा जीव हा मौल्यवान आहे.आणि या जीवाची प्रवास करताना वाहन चालकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. चालकांनी चुका करू नये.त्यासाठी चालकाने वेगावर नियंत्रण ठेवून प्रवाशांना सुखरूप पोहोचविणे हे
त्यांची जबाबदारी आहे.वाहनचालक बस बेजबाबदारीने चालवत असेल तर प्रवाशांनी कुणाकडे बघावे .आता तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागते की काय असे प्रवाशांच्या बोलण्यातून जाणवते .तरीपण मनावर मोठा दगड ठेवूनच मुलांना ट्रॅव्हल्स ने प्रवास करावाच लागेल .मात्र पुन्हा अशी अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये आणि प्रवाशासोबत वाईट घडू नये म्हणून वाहनचालकाने अति वेगाने वाहन चालविणे टाळले पाहिजे. तसेच वेगावर नियंत्रण ठेवणे ,अग्निशामक यंत्र ,कठीण परिस्थिती आली तर काच फोडण्यासाठी लागणारे अवजार या गोष्टी वाहन चालकाने स्वतः तपासायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समयसूचकता. संकटकाळींन परिस्थिती जरी निर्माण झाली तरी (मात्र असे कधी होऊ नये) यातून मार्ग काढण्याचा उपाय वाहन चालकाकडे असणे गरजेचे आहे. तसेच प्रवाशांना कुठलाही त्रास न होता काळजीपूर्वक पोहोचविले पाहिजे.कारण समस्त प्रवाशांची जबाबदारी ही वाहनचालकावरच असते.त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी उपयोजन करणे आणि चालकांची जागृती करणे हेही तेवढेच गरजेचे आहे .तेव्हाच कुठल्याच प्रकारचे मनावर दडपण न येता प्रवाशांचा प्रवास आनंदाने होऊ शकेल. या अपघातातून स्वतःचा जीव वाचविणाऱ्या मुलांच्या धाडसाचे कौतुक करते . आणि मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ मिळो तसेच जखमी प्रवासी लवकर बरे होऊन या प्रसंगातून बाहेर पडो हीच प्रार्थना.














