अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती :जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील (वनोजा बाग) चिंचोना गावाजवळ २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एका महिलेवर अस्वलीने प्राणघातक हल्ला केला.
चिंचोना गावापासून एक किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी खडकसेवळी शिवारात कापूस वेचण्याकरिता जात असलेल्या महिला मजुरावर अस्वलीने अचानक हल्ला चढविला. काही मजुरांनी सुरक्षित अंतर गाठण्यासाठी पलायन केले. तथापि, रत्ना श्यामराव वानखडे (५०, रा. चिंचोना) या अस्वलीच्या तावडीत सापडल्या. अस्वलीने पायाच्या टोंगळ्यानजीक दोन जागी त्वचा खोलवर फाडल्याने महिला गंभीर जखमी झाली. महिलांची आरडाओरड ऐकून गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अस्वलीने पलायन केले. त्यामुळे जखमी महिलेचे प्राण वाचले. ग्रामस्थांनी रत्ना वानखडे यांना अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, महिलेला गंभीर मार असल्याने डॉक्टरांनी महिलेवर प्राथमिक उपचार करून तिला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता, वनकर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात महिलेची भेट घेतली.

