गेल्या दहा दिवसापासून अध्यापन बंद परीक्षा पुढे ढकलण्याची पालकाची मागणी.
विठ्ठल पाटील
लातूर प्रतिनिधी
उदगीर- राज्य मागास आयोगाने मराठा समाजाचे आरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यभर सर्वेक्षण सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या दहा दिवसापासून राज्यभरातील शिक्षक सर्वेक्षणाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने अध्यापन पूर्णपणे बंद आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश खाजगी शाळांमध्ये केवळ मुख्याध्यापक आणि सेवक हेच शाळेमध्ये उपस्थित आहेत. तर सर्वच शिक्षक मराठा सर्वेक्षणाच्या कामांमध्ये नियुक्त असल्याने गेल्या दहा दिवसापासून कोणत्याही विषयाचे कसल्याही प्रकारचे अध्ययन अध्यापन झालेले नाही. आता एक फेब्रुवारी पासून पाचवी ते आठवी या वर्गाची घटक चाचणी परीक्षा तर दहावी वर्गाची दुसरी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये आता परीक्षा घ्यायची कशी ? हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. तर अध्यापन झालं नसल्याने परीक्षेमध्ये प्रश्न न शिकवलेल्या भागावर आले तर काय करावं ? हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना भेडसावत आहे. लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक संघाने या परीक्षेचे वेळापत्रक एक महिन्यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व शाळांना जारी केलेले आहे. यासोबतच एक महिन्यापूर्वीच प्रश्नपत्रिका छापून तयार आहेत. पण अचानकच सर्वेक्षण सुरू झाल्याने शिक्षक शाळेमध्ये नसल्याने प्रत्येक विषयाचे किमान दोन ते तीन धडे शिकवण बाकी आहे. आणि याच घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर लिहावं काय ? ही चिंता विद्यार्थी व पालकांना सतावत असल्याने विद्यार्थी पालक आणि मुख्याध्यापक यांच्या वतीने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. याबाबत लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ नेमकी काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील खाजगी शाळांचे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून आहे.

