बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
लातूरसह मराठवाड्याच्या भाग्योदयाचा क्षण अखेर उजाडला असून मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा आणि तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘मराठवाडा रेल्वे कोच कारखान्या’चे लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि लाडके पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज पार पडले. त्याचबरोबर देशातील ७०० हून अधिक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मा. पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले.
भारतीय रेल्वे दिवसेंदिवस प्रगती करत असून वंदे भारत सारख्या सेमी हायस्पीड रेल्वेने आज संपूर्ण देश एकत्र जोडला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, गती आणि विकास या तिन्हींची सांगड आज भारतीय रेल्वे घालत आहे. आगामी काळामध्ये भारतीय रेल्वेची ही मागणी जगभरातून वाढणार असून लातूर येथील रेल्वे कोच कारखान्यामधून अनेक रेल्वे कोच तयार होऊन जगभरात जातील. ज्यामुळे देशाचे नाव उज्ज्वल होण्याबरोबरच स्थानिक प्रदेशाचा विकास देखील होईल, असा विश्वास मा. पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. मराठवाड्याचे भविष्य बदलण्यासाठी हा रेल्वे कोच कारखाना लातूर येथे उभारण्याची मागणी आम्ही त्यावेळी मांडली होती. पंतप्रधान मोदी साहेब, तत्कालीन रेल्वेमंत्री पियुषजी गोयल साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मराठवाड्याच्या दुर्गामी विकासाचा विचार करून ही मागणी मान्य देखील केली. त्यानंतर अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून हा कारखाना उभा राहिला असून या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर थांबून आगामी काळात ‘विकसित मराठवाडा’ घडेल, असा ठाम विश्वास लातूर येथील कार्यक्रमात बोलताना माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या वेळी व्यक्त केला.
यावेळी राज्यपाल मा.ना. रमेश बैस, मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मा.ना. मंगलप्रभातजी लोढा यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे तर खासदार सुधाकरजी श्रृंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे, सहाय्यक जिल्हाधिकार नमन गोयल, रेल्वेचे मुख्य कारखाना अभियंता सुबोधकुमार सागर, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदासजी काळे, भाजपा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, गणेश हाके, सोलापूर रेल्वे विभागाचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

