प्रचार रॅलीत ढोलताशाचा गजर अन् फटाक्यांची आतिषबाजी
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर – चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मारेगाव येथे बैलगाडी हाकून प्रचार रॅलीत सहभाग घेतला. ढोलताशाचा गजर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, फटाक्यांची आतिषबाजीने परिसर दणाणून गेला.
अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांना बैलगाडी हाकत असलेल्या ना. मुनगंटीवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनतेला अभिवादन करणा-या ना. मुनगंटीवार यांना नागरिकांनीदेखील तितक्याच जोरकसपणे प्रतिसाद दिला.
मारेगावातील पेट्रोल पंपापासून सुरू झालेली ही प्रचार रॅली पोलीस स्टेशनमार्गे डॉ. आंबेडकर चौकात पोहोचली. चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ना. मुनगंटीवार यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, रवी बेलुरकर, राजू उंबरकर, अविनाश लांबट यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

