जन्म सजवायला माणसासारखा
कोण आहे जगी गौतमासारखा?
लाभले जन्मतः सौख्य सारे जरी
राहिला जो सदा साधकासारखा!
पाहिल्या, जाणल्या माणसांच्या व्यथा
शोक आगीतल्या पाखरासारखा!
मार्ग चालायला शोधला दिव्य हा
मोद दाटे मनी सागरासारखा!
जाण अज्ञान हे जीवना जाळते
बोध रमवी जिवा चांदण्यासारखा!
चेतवाया हवा तू मनीचा दिवा
तर्क यावा तुझा डोळसासारखा!
सूत्र सृष्टीतले नीट समजून घे
भोग विसरून जा बुडबुड्यासारखा!
अंत नाही कधी कामनांना इथे
मोह नाही बरा हावऱ्यासारखा!
वेळ आली कधी द्यायची दानही
सांड मेघातल्या पावसासारखा!
थोर नीती किती वाटूनी या जगा
दरवळे अंतरी सौरभासारखा!
महादेव भोकरे,
वडूज (सातारा)


मला गझल फार कळत नाही पण अर्थ जो मला समजला तो खुप छान आहे.
हे कडवे खुप आवडले
अंत नाही कधी कामनांना इथे
मोह नाही बरा हावऱ्यासारखा!