योजनेविषयी जनजागृती करावी : कृषी विभागाशी चर्चा
दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर
एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गावातील १००% शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविणेबाबतची कार्यवाही जलदगतीने करण्यात यावी, यासंदर्भात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते कृषी विभागाला सर्वतोपरी सहकार्य करतील अशी ग्वाही भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकर तोटावार यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. यावेळी भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांची उपस्थिती होती.
राज्य शासना तर्फे यावर्षी 1 रुपया प्रति अर्ज दराने प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२४-२५ राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप २०२४-२५ या हंगामाकरीता भात (तांदुळ), कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी, मुग व उडीद या अधिसुचित पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या जोखिम बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा या करीता केवळ १ रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२४-२५ सुरू करण्यात आलेली असूनसुद्धा या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षेप्रमाणे नोंदणी झालेली नाही. त्यामुळे कृषी विभागाने या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा असे ब्रिजभूषण पाझारे यांनी सूचित केले.
या योजनेंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत दि. १५ जुलै, २०२४ पर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग व्हावा, या करीता, आपल्या ग्रामपंचायत स्तरावर सभा घेऊन, दवंडीचे माध्यमातून, ग्रापपंचायत सदस्यांचे मदतीने आपले गावातील १००% शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेऊन लाभ घेण्याबाबत जनजागृती करावी, अशी विनंती ब्रिजभूषण पाझारे यांनी या चर्चे दरम्यान केली. शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा मोठया संख्येने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

