
आज दिनांक – १४/७/२०२४ लेख – माझे गुरु
मानवी जीवन हे एक सुख दुःखाचा मिलाफ आहे. जन्मास येताना कोणीही सर्वच गोष्टी शिकून येत नाही , जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस अनेक चढ-उतार पार करत असतो. हे शिखर चढत असताना तो बऱ्या वाईट सर्व काही गोष्टी शिकतो. येणाऱ्या अनुभवातूनच तो घडतो.
माझ्याही बाबतीत असंच घडलं . खरंतर , माझ्या आयुष्यातील माझे पहिले अन् अविस्मरणीय असे माझे गुरु म्हणजे माझे आई वडील . अगदी बालपणापासूनच त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या संस्काराचे बीज आम्हा भावंडांवर पेरले .खरंतर, माझा भूतकाळ हा अंगावर शहारे आणणारा ,मन सुन्न करणारा आहे , पण अशा परिस्थितीतही स्वतः वरचा विश्वास न डगमगता मनाने जे खंबीर होते ते माझे गुरु म्हणजे माझे आई वडील .
आयुष्य जगत असताना अनेक प्रकारची लोकं भेटतील, अनेक चांगले वाईट अनुभव येतील पण ते सहन करण्याची ताकद , संयम असायला हवा.
जीवनात कितीही संकट आली तरी ते हसत हसत निधड्या छातीवर झेलण्याचे सामर्थ्य असायला हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं.
हे जीवन म्हणजे काटाकुट्याच्या वाटा आहेत. स्वतःला हव्या त्या गोष्टी लगेच मिळतीलच असे नाही . कधी कधी काही गोष्टी मना विरुद्ध घडतील. कधी दुःख वाट्याला येईल पण अशा परिस्थितीतही हार न मानता जिद्दीने कसं उभं राहायचं हे माझ्या आईने मला शिकवलं.
इतकंच नव्हे तर , आजची वेळ वाईट आहे , आजची परिस्थिती उद्या बदलेल, ‘हे ही दिवस जातील बाळा ‘ या माझ्या आईच्या एका सकारात्मक ऊर्जेने आज मला घडवले.
खरंच मी माझ्या आई वडीलांची फार ऋणी आहे . कारण, माझ्या आई-वडीलांनी मला कोणत्याही गोष्टींची कमी पडू दिली नाही ,त्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली नाही, वेळोवेळी एक चांगल्या प्रकाराचे सकारात्मक आचार विचार माझ्या मनावर बिंबवले . एक मुर्तीकार बनून माझ्या जीवनाला आकार दिला .माझे कलागुण ओळखून मला एक प्रसिद्धी मिळवून दिली.
म्हणूनच, मला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे माझे दीपस्तंभ, माझा अभिमान अन् माझ्या यशाचे खरे शिलेदार म्हणजे माझे गुरु – माझे आई वडील
लेखिका- प्रांजल प्रकाश एटम
गोटखिंडी (सांगली)














