आज दि.14.7.24 लेख – माझे गुरु
गुरु म्हटले की आदरभाव असतो.सन्मान असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही ना काही शिकत असतो, ते शिकताना आपल्याला गुरु भेटत असतात. माझ्या लहानपणी माझी आई, आजी माझी गुरु होती. नंतर शाळेत गेल्यावर शाळेतील माझ्या शिक्षिका गुरु झाल्या. शाळा कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक हे गुरूच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरू त्यांची आई असते आणि नंतर गुरु शिक्षिका असतात.
माझ्या आयुष्यात दुसरे अप्रत्यक्षपणे गुरु असतील तर ते पुस्तके. शाळेपासूनच मोठ्या लोकांचे आत्मचरित्र, चरित्र, कथा, मुलाखती पुस्तकातून वाचल्यामुळे पुस्तकेही माझे गुरु झाले. मोठ्या लोकांचे आत्मचरित्र वाचल्यामुळे त्यांची प्रेरणा मला मिळाली. त्या वाचनाच्या सवयीमुळेच कधी लिहायला लागली आणि साहित्यिक ही बनली हे कळलेच नाही. या साहित्य क्षेत्रात पदार्पण केल्यावर इकडे खूपच जण मार्गदर्शक म्हणून भेटले हे सगळे मार्गदर्शक गुरुच होते. त्यांच्यामुळेच माझी साहित्य वाटचाल सुखकारक ठरली. साहित्याचे ग्रुप, ते चालवणारे संचालक ही आपल्या कवितेवर अभिप्राय देत असतात. त्यामुळे परत नवीन रचना करण्यास एक उत्तेजन मिळते, म्हणूनच तेही माझे गुरुच मी मानते.
मध्यंतरी एकदा गुरुच्या निरीक्षणाखाली एक योगा क्लास शिकली होती, ते शिकताना त्या गुरुजींच्या सत्संगास ही हजेरी लावली, त्या योगा शिक्षणामुळे बरेच काही शिकता आले तेव्हा ते गुरुजींही माझे गुरु होते.
आपल्याबरोबर असणाऱ्या आपल्या मैत्रिणी आपले घरातील व्यक्ती, आपल्याबरोबर काम करणारे आपले सहकारी ही आपले गुरूच असतात असे मला वाटते, कारण आपल्या मैत्रिणीकडून आपण खूप काही शिकत असतो
लेखिका रेखा डायस
गोवा

