श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी, जिवती
9545421449
जिवती येथील बाजारपेठतील प्रीतम नगराळे यांच्या ऑटोमोबाईल आणि योगेश भदाडे यांच्या किराणा दुकान व कापड केंद्राला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाले. यात ऑटोमोबाईल दुकानाचे २५, तर किराणा व कापड दुकानाचे ३५ लाखांचे नुकसान झाले. प्रीतम नगराळे व योगेश भदाडे हे नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेत दुकाने बंद करून घरी गेले. मध्यरात्री अचानक दोन्ही दुकानाला आग लागली. दुकानातील आगीचा भडका शेजारी असलेल्या डॉ. अंकुश गोतावळे यांच्या घरात घुसल्याने जाग आली. त्यानंतर डॉ. गोतावळे यांनी घटनेची माहिती दुकान मालकांना दिली. आग विझविण्यासाठी नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल पोहचेपर्यंत दोन्ही दुकाने जळून खाक झाली. आग शार्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचली असती, आगीवर नियंत्रण मिळवता आले असते. परंतु, गाडी तब्बल दीड तास उशिरा पोहचली असे भदाडे यांनी सांगितले.

