
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर:-बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत बांबू कार्यशाळा चंद्रपूर येथे महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी. एम. जाधव यांचा अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधनाचा कार्यक्रम या प्रशिक्षण केंद्राचे वनपरिक्षेत्राधिकारी श्री ए डी मल्लेलवार यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.मा. मल्लेलवार यांचे हस्ते पाण्याने पेटणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. सापांच्या पोस्टर्सच्या सहाय्याने सापाबद्दलची सविस्तर माहिती जाधव यांनी दिली. मंत्राने विषारी सापाचे विष उतरवून दाखविणाऱ्या मांत्रिकास महाराष्ट्र अंनिस कडून २१ लाख रुपयाचे बक्षिस असल्याचे जाधव यांनी सांगितले. जादूटोणा भुत भानामती करणी काढणे मंत्राने विषारी सापाचे विष उतरविणे नरबळी दिल्याने गुप्त धन प्राप्त होणे या अफवा आहेत. ढोंगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पेरलेल्या अफवा आहे त्यावर विश्वास ठेवू नका.जादूटोणा भुत भानामती करणी काढतांना ढोंगी लोकांकडून आर्थिक शारीरिक मानसिक किंवा लैंगिक शोषण होत असेल तर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत अशा लोकांना ६ महिने ते ७ वर्ष सजा तसेच पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपये आर्थिक दंडही होऊ शकतो असे जाधव यांनी सांगितले. ढोंगी लोकांच्या तथाकथित चमत्काराबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ढोंगी लोक दाखवित असणाऱ्या चमत्कारासारखेच विज्ञान व हातचलाखीवर आधारित विविध चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून प्रत्येक प्रयोगामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी स्पष्ट करून सांगितले .अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत या कार्यक्रमात मिळालेल्या माहितीचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करा असे आवाहन या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मल्लेलवार यांनी केले.या प्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण, या केंद्राचे वनपाल एस एस लाटकर, पर्यवेक्षिका योगिता साठवने, प्रयोगशाळा सहाय्यक वर्षा राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता साठवने यांनी केले व आभार प्रदर्शन एस एस लाटकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वर्षा राठोड यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्राचे कर्मचारी व कारागीर बहुसंख्येने उपस्थित होते असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.














