ठाणे प्रतिनिधी – आज दि. ०२/०९/२०२४- केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत योजनांची जनजागृती करण्याकरिता ‘शासनाच्या योजनांची दिंडी’अभियान राबवण्यात येणार आहे. अनेक वैयक्तीक लाभाच्या योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘शासनाच्या योजनांची दिंडी’अभियान दि. ३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची एकत्रित अभिसरणातून व विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या सहभागातून राबविल्यास ठराविक कालमर्यादेत लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळू शकेल. तसेच आतापर्यंत लाभ न मिळालेल्या गरजु व पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ मिळू शकेल.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर प्रभावीपणे योजनांचा प्रसार व जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध विभागांनी एकत्रित येऊन त्यांच्या अभिसरण, सक्रिय सहभाग व पुढाकारातून “शासनाच्या योजनांची दिंडी” अभियान राबवण्यात येणार आहे.
“शासनाच्या योजनांची दिंडी” अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसिलदार (सर्व) नोडल अधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती (सर्व) सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय/ समाज मंदिर/ सार्वजनिक इमारत/ शाळा या ठिकाणी “शासनाच्या योजनांची दिंडी” अभियान राबवण्यात येत असून ग्रामस्थांनी या अभियानात पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, रेशन कार्ड, जिल्हा परिषद/ पंचायत समिती सेस वैयक्तिक लाभाच्या योजना, आधार कार्ड/ अपडेशन, बँक अकाऊंट/बँक सखी LDM, आधार सीडिंग, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, उत्पनाचा दाखला, वन हक्क दावे, जॉब कार्ड, आयुष्मान भारत योजना, कामगार पोर्टल नोंदणी, लेक लाडकी योजना, दिव्यांग तपासणी पोर्टल, स्कॉलरशिप, जन्म मृत्यु नोंदणी, विवाह नोंदणी, कृषी विभागातील विविध योजना, शासनाच्या विविध इन्शुरन्स योजना, CMEGP, PMEGP PMFME, क्रेडीट लिंकेज, PM विश्वकार्मा, शाळाबाह्य मुले शाळा प्रवेश, किसान समृद्धी योजना, कातकरी घरकुल योजना (PM जनमन), PM जनधन, अटल पेन्शन अशा एकूण ३५ योजनांची अभियानांतर्गत नोंदणी व लाभ देण्यात येणार आहे.

