कथा – आयुष्याच्या वळणावर
मेघाचे लग्न ठरले त्यावेळी तिला लग्नाला होकार द्यावाच लागला.कारण होते तिच्या बाबांची ढासळत जाणारी तब्येत.आपल्या हयातीत पोरीचे लग्न उरकावे अशी त्यांची इच्छा होती.तिचे लग्न अखिलेश सोबत तिच्या बाबांनी लावून दिले आणि त्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.मेघाची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती.तिच्या बाबांनी दुसरे लग्न न करता मेघाला मोठे केले.तिच्या संगोपनासाठी एक ताई ठेवली होती.तीच रोज मेघाला शाळेसाठी डबा बनवून देऊन तिला शाळेत सोडून यायची आणि शाळेतून परतही तीच आणायची.म्हणजे ती मेघाची पूर्ण काळजी घ्यायची.संध्याकाळी मेघाचे बाबा आल्यावरच ती जायची.मेघा हळूहळू लहानाची मोठी झाली.खरेतर ती वीस एकवीस वर्षांची तरूणी होती.तिचे लग्नाचे वय अगदीच काही झाले नव्हते.पण तिच्या बाबांना तिचे लग्न लवकर करायचे होते.मेघाचे वडील सरकारी नोकरीत कारकून होते.आता ते रिटायर झाल्यामुळे त्यांना पेंशनचे पैसे मिळत होते.राहायला स्वतःचे घर असल्याने घरभाडे वाचायचे.पण ते सारखे आजारी राहू लागल्याने त्यांच्या औषधोपचारावर बराच खर्च व्हायचा.मेघाचे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण सुरू होते.पण मधेच लग्न झाल्यामुळे शिक्षण अर्धवट राहते की काय याची भिती तिला वाटत होती.तिने याबाबत अखिलेश सोबत बोलायचे ठरवले.तिची खूप इच्छा होती की ती फॅशन डिझायनर व्हावी.ती शेवटच्या वर्षाला होती.पण अचानक अखिलेश सोबत तिचे लग्न जुळले.
अखिलेश एक समजुतदार व्यक्ती होता.अतिशय साधा, सरळ मनाचा.मेघा त्याच्यापेक्षा दहा वर्षाने लहान होती.लग्नानंतर मेघाला आपले जीवन निरस वाटायला लागले.मेघाचे शिक्षण थांबल्यामुळे तिला फार ताण आला होता.अखिलेशचा केबलचा बिझनेस होता.त्यातून त्याला चांगली कमाई होत असे.एक दिवस मेघा त्याला म्हणाली,” मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे.” अखिलेश तेथून काही न बोलता गुपचूप निघून गेला.मेघाला वाटलं की अखिलेश तिच्यावर रागवला आहे.मात्र रात्री जेव्हा अखिलेश वापस घरी आला तेव्हा त्याने काॅलेजचा फाॅर्म मेघाच्या हातात दिला.मेघाला काॅलेजमध्ये जाता यावं म्हणून त्याने तिला गाडी शिकवायला सुरुवात केली.थोड्याच दिवसात मेघा गाडी चालवायला शिकली.अखिलेशला वेळ मिळाला की ती कधीकधी तिने तयार केलेले जेन्स्ट्स कपडे घालून पाही.आता ते दोघं बरेच जवळ आले होते.एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होते.
एकदा रात्री मेघा आणि अखिलेश बाल्कनीत बोलत बसले होते.अखिलेश मेघाला म्हणाला,” आपले लग्न विपरीत परिस्थितीत झाले होते.मी तुझ्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठा आहे.खरं सांगायचं तर मी तुला शोभत नाही.मला खरंतर याची थोडी लाज वाटते.तू तुझे जीवन तुझ्या पध्दतीने जगू शकते.मेघा अखिलेशला म्हणाली,” मान्य करते की आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप अंतर आहे.पण मला आता कळून चुकले की तुम्ही फार चांगले आहात.तुमच्यासारखा दुसरा चांगला माणूस मला शोधूनही सापडणार नाही.” मेघाचे बोलणे ऐकून अखिलेशला खूप आनंद झाला.मेघाने हसतच अखिलेशला मिठी मारली.त्यांचा संसार आता ख-या अर्थाने सुरू झाला होता.
लेखिका लैलेशा भुरे
नागपूर

