रास्ता तातडीने दुरुस्ती करण्याची आप संतोष बोपचे यांची मागणी
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – इंदिरानगर, नाग मंदिर, राहागडाले किराणा स्टोअर्स परिसरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी सिमेंटचे रस्ते फोडण्यात आले होते. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले असून, खड्ड्यांमुळे बरेच अपघात होत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी अपघातांमुळे गंभीर जखमा झाल्याची नोंद आहे. या गंभीर परिस्थितीत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार महानगरपालिकेकडे दुरुस्तीची मागणी केली आहे, परंतु अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही.
आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर चे संघटणमंत्री संतोष बोपचे यांनी या परिस्थितीबाबत संताप व्यक्त करत महानगरपालिकेकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांमुळे जीवित आणि आर्थिक नुकसान होत आहे. या खड्ड्यांमुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे, आणि या समस्येचे लवकरात लवकर निराकरण झाले नाही तर भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकतात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेने त्वरित दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी.”
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महानगरपालिकेने लवकरात लवकर या रस्त्यांची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल.
चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी सर्व नागरिकांची एकमुखी मागणी आहे. निवेदन देतांनी आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटणमंत्री संतोष बोपचे व सिकेंदर सागोरे, जिल्हा संघटणमंत्री योगेश मुऱ्हेकर, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्ये, नजमा बेग, मंगला मुखे, करुणा, सुजाता देठे, कविता व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

