
आ.कुणाल पाटील यांचे विशेष प्रयत्न.
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) – धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पांझरा नदी काठी असलेल्या न्याहळोद आणि जापी गावाच्या संरक्षणासाठी संरक्षण भिंतीच्या कामाच्या बांधकामाकरीता एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.
धुळे तालुक्यातील न्याहळोद आणि जापी ही गावे पांझरा नदी काठावर वसलेली आहेत. पावसाळ्यातील महापूरामुळे नदी काठच्या गावांना धोका असतो. अनेकवेळा नदी काठावरील वसलेल्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भिती असते. परिणामी प्राणहानी व वित्त हानी होत असते. म्हणून न्याहळोद आणि जापी येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात यावे यासाठी आ.कुणाल पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करुन आ.पाटील यांनी आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी पूर प्रतिबंधक कामांना महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळवून घेतली. महसूल व वन विभागातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन अंतर्गत न्याहळोद व जापी येथे पांझरा नदीवर संरक्षण भिंतीचे बाधंकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने एकूण अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जापी येथे सरंक्षक भिंत बांधकाम करणे(एकूण रक्कम १ कोटी रु.), न्याहळोद येथे सरंक्षक भिंत बांधकाम करणे(एकूण रक्कम १.५० कोटी रु.) निधी मंजुर झाला आहे. आ.कुणाल पाटील यांनी सरंक्षक भिंतीचे कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.














