सरकारला सज्जड इशारा – अन्यथा मोठे जनआंदोलन उभारणार
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधितांकडे याची तक्रार नोंदवली. मात्र पिक विमा कंपन्यांकडून अद्यापही हजारो लाभार्थ्यांना पिक विम्याचा लाभ मिळालेला नसून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. अन्यथा महायुती सरकार विरोधात मोठे जनआंदोलन उभारू असा सज्जड इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
सन २०२३-२४ मध्ये ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी ,सावली व सिंदेवाही या तालुक्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीतून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा प्रचंड आर्थिक फटका बसला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पिक विमान काढणाऱ्या अनुक्रमे सावली तालुक्यातून एकूण २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून पिक विमा कंपनीकडून पाहणी अंति ७ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रार प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात एकूण ४० हजार २६४ शेतकऱ्यांनी शेतीचा पिक विमा काढला. यापैकी ५ हजार ६४५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार नोंद केली. तर सिंदेवाही तालुक्यात पिक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकूण २० हजार २६३ इतकी असुन यापैकी हजारो शेतकऱ्यांना पिक विमा लाभ मिळालेला नाही.एकीकडे बँकेचे व हात उसने कर्ज व सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली तसेच अतिवृष्टी व अस्मानी संकटाने ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. आपल्या कृषीप्रधान देशात देशाच्या अन्य दात्याला दोन वेळच जेवण मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागत असून शासनाचे दुर्लक्षित धोरण, शेतमालाला रास्त भाव मिळत नाही,सततची नापिकी, अस्मानी संकट व शेती उपयोगी बियाणे, खते व इतर साहित्याचे वाढलेले प्रचंड भाव यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. केवळ सत्ता प्राप्तीसाठी राज्य सरकार खोट्या आश्वासनांची खैरात वाटून नाहक व फोल ठरणाऱ्या योजनांचा डंका वाजवण्यात व्यस्त आहे. सणासुदीच्या तोंडावर सरकार तुपाशी शेतकरी मात्र उपाशी अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही विमा लाभ न मिळाल्याने याची गंभीर दखल घेत राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकाराला राज्यातील महायुती सरकार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हलगर्जी धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नुकसानग्रस्त पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरित पीकविम्याचा सरसकट लाभ द्यावा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारू असा सज्जड इशारा दिला आहे.

