
“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी” ठरले मा. कवी – प्रा. प्रशांत खैरे, गडचांदूर जि. चंद्रपूर, तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या मा. कवयित्री- मनिषा हिळको, कुरखेडा जि. गडचिरोली विजयी
सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – भारत देशात अनेक जाती, अनेक धर्म, अनेक परंपरा आहेत. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचा आणि परंपरांचा अभिमान वाटतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहितांना या बाजूकडे विशेष लक्ष दिले आहे. कोणी कोणत्याही जाती धर्माचा किंवा प्रांताचा असेल तरी सर्वांना समान न्याय, समान दर्जा, समान संधी, समान अधिकार या संविधानाने दिला आहे. तळागाळातील गरीब, उपेक्षित माणसाला देशाच्या विकासातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अस्पृश्य म्हणून गणण्यात आलेल्या समाजाला आरक्षण दिले आहे. या देशात गरीब-श्रीमंत, उच-नीच हा भेदभाव राहू नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून हे संविधान लिहिले आहे. हे विशाल संविधान लिहायला २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस याला कालावधी लागला. भारतीय राज्यघटना अर्थात संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे.
या संविधानाने सर्व भारतीय जनतेला एका सूत्रात बांधले आहे. हे संविधान म्हणजे भारताचा प्राण आहे. उपेक्षितांच्या स्वप्नांचे आगर आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या संविधानात अनेक कायदे, कलम आहेत. या संविधानाने कोणावरही अन्याय केला नाही. असे संविधान आज काही लोकांना नको आहे. आजच्या घडीला भारतीय संविधान धोक्यात आले आहे. या संविधानाला वाचविणे व त्याचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आजच्या बिकट परिस्थितीत ‘संविधान’ काय म्हणतो ते जाणून घेण्यासाठी हा उपक्रम देण्यात आला होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिक बंधू-भगिनींचे मनापासून धन्यवाद.
स्पर्धा म्हटली तर हार- जीत असतेच. परंतु “मी संविधान बोलतोय” या विषयावर कवितांच्या माध्यमातून अनेकांची मते जाणून घेता आली. सर्वांनी खूप छान दर्जेदार कविता सादर केल्या आहेत. सर्वांचेच समूहातर्फे धन्यवाद आणि कौतुक.
“सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र. ७ दि. ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली.”मी संविधान बोलतोय” या विषयावर झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता.
या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी “महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान प्रा. प्रशांत तुळशीराम खैरे,गडचांदूर जि. चंद्रपूर यांना मिळाला आहे. कवी अक्षर साहित्य कलामंच चे ते संस्थापक असून मासिक, दिवाळी अंक, अनेक वृत्तपत्र, स्मरणिका, अशा सामाजिक माध्यमातून त्यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा “मला श्वास घेता येत नाही” हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी कोरोना काळात गरजूंना व गरीबांना मदत केली. होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करणे, परिवर्तन वादी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी चे कार्यक्रम काॅलेज व गावात घेऊन समाजप्रबोधनाचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. कवींना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. या स्पर्धेत “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” चा सन्मान मिळाला आहे कवयित्री मा. मनिषा संतलाल हिळको, कुरखेडा जि गडचिरोली यांना कवयित्री इंग्रजी विषयात एम. ए. असून त्यांच्या अनेक कविता विविध माध्यमातून प्रकाशित झाल्या आहेत.
दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने या आँनलाईन साहित्य समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. या समूहाचे संस्थापक मा. देविदास गायकवाड तसेच सुनिता तागवान हे असून वैशाली सुर्यवंशी व सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.
प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.














