हाँगकाँग या देशातील विमानतळावर भारतात येणाऱा भारतीय विद्यार्थी त्याचे आवश्यक कागदपत्रे घेऊन चेकींगच्या रांगेत उभा होता. मागे उभ्या असलेल्या एका तरूण विदेशी मुलाने समोरच्या भारतीय मुलाला विचारले. “आर यू इंडीयन?” भारतीय मुलाने स्मित हास्य करून होकार दिला. लगेच त्या मुलाने मोबाईल सुरू करून त्याला काही व्हिडिओ दाखवायला सुरूवात केली… त्या व्हिडिओत होते..कचरा करणारे भारतीय लोक आणि जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचे ढिगारे, घाणेरडे शौचालये, रस्त्यावर व रस्त्या बाजूला पडलेला कचरा, उघड्या नाल्या..असे किळसवाणे दृश्य !.. ते दाखवून तो विदेशी युवक गालातल्या गालात हसत होता तर भारतीय युवक लाजेने खाली मान घालून निरुत्तर झाला होता.. काय बोलावे काही कळेना, बोलायला जागा तरी कुठे होती ? जे होते ते वास्तविकच होते. या प्रसंगावरून आपल्याला कळेल की, जगात आमच्या देशाची कशी टिंगल केली जाते. आपल्या देशातील घाणीमुळे जगासमोर आमची काय लायकी असेल ? विदेशात भारतीय जनता व प्रशासनाकडे ते कोणत्या नजरेने पहात असतील ? याची आपण नक्कीच कल्पना करू शकतो.
निरूपयोगी वस्तू व घाण घराबाहेर टाकल्या जाते. स्वतः चे घर स्वच्छ आणि आजूबाजूचा परिसर मात्र गलिच्छ व घाणेरडा ! अशी अवस्था अनेक ठिकाणी बघायला मिळते. जवळपास ६०-६५ वर्षापुर्वीच अडाणी असलेल्या संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या प्रवचनातून आणि भजनांतून लोकांना कचऱ्याचे दुष्परिणाम काय होतात ते समजावून सांगितले आहे. हातात खराटा घेऊन ते स्वतः गाव, शहर झाडून काढीत. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत फिरत. परंतु त्याचा काही परिणाम झाला असे वाटत नाही.
आपल्या देशात असेही दिसून येते की, शहरात स्वच्छता आणि गाव खेड्यात कचरा….एकंदरीत काय तर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न झाल्यास जिकडेतिकडे घाण आणि दुर्गंध पसरली आहे. त्यामुळे अनेक रोगराईस आमंत्रण मात्र दिले जाते. शहरांमध्ये रस्ते, बगीचे झाडायला सफाई कामगार उपलब्ध आहेत. शहरात सुशिक्षित लोकं असल्यामुळे तिथे जरा काळजीपूर्वक साफसफाई केली जाते तरी देखील काही गलिच्छ भाग दृष्टीस पडतोच. मोठमोठ्या शहरातील झोपडपट्टीत गेल्यास तिथे जागोजागी घाण दिसून येते. तेथील गरीब लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यातून होणारे आजार.. आणि आजारी पडल्यास होणारा खर्च.. कधी कधी मृत्यू सुद्धा! शहरी भागातील स्लम एरीयात अशी तफावत बघायला मिळते. अशावेळी विचार येतो तो प्रशासनाचा. प्रशासनाला जाग का येत नाही? खेड्यापाड्यात तर विचारूच नका.. जागोजागी उकिरड्यावर पसरलेली घाण, तेथून वाऱ्याने उडणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या.. सडलेला भाजीपाला, तुटलेल्या वस्तू.. सर्व काही बेवारस पणे पसरलेले असते. शहर असो वा खेडे.. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद ई विभाग कार्यरत असूनही कचऱ्याचे पाहिजे तसे व्यवस्थापन होतांना दिसत नाही. इतकेच काय तर तेथील कर्मचारी पान, खर्रा खाऊन जागोजागी थुंकून ठेवतात. तेथील खिडक्या, पायऱ्यांच्या कडा, भिंतीचे कोपरे, संडास, सारे काही लाल,काळे,पिवळे झालेले दिसतात. शहरी भागात जरी हे चित्र कमी प्रमाणात असले तरी तालुक्यातील कार्यालयांमध्ये हे दृश्य हमखास बघायला मिळते. हे सर्व बघून तेथील भिंतीला, खिडक्या व दारांना सुद्धा हात लावायची इच्छा होत नाही. सांडपाणी, तुटलेले वाहते नळ, रस्त्यावरून वाहते पाणी, मोकळ्या नाल्या, केर टोपल्या गच्च भरून खाली पडणारा कचरा बघून मन अस्वस्थ होऊन प्रशासनाबद्दल नाना प्रश्न मनात येतात.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला हत्तीपाय, मलेरिया, डेंग्यू , पोलियो या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोग प्रतिबंधक गोळ्या वाटप करणारे कर्मचारी घरोघरी फिरतात. जबरदस्तीने गोळ्या खायला लावतात. चिखल, घाण, कचरा, खुल्या गटारी , पावसाचे साचलेले पाणी या मुळे डास व माशांची पैदास होते आणि यामुळे नाना आजार तयार होतात. कोट्यावधी खर्च करून गोळ्या वाटप केले जाते. त्यापेक्षा घाण साफ करणे हा उत्तम पर्याय नाही का ? प्रशासनाने जर योग्य लक्ष पुरविले तर आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील..डास, माशा,दुर्गंध राहणार नाही. तेव्हा गर्वाने आपण म्हणू शकतो… मेरा भारत महान!
गाडगेबाबा निरक्षर होते तरीसुद्धा त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखले. गावागावात कीर्तन व भजनाद्वारे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आता काळ बदलला.. सर्व काही बदलले. अत्याधुनिक युगाचा प्रारंभ झालेला आहे. असे असताना देखील घाणीबद्दल आपल्या देशात पाहिजे तशी जागरूकता नाही असे खेदपूर्वक म्हणावे लागेल. “मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है!” असे म्हणायचे असेल तर खरोखरच आपल्याला आपले विचार बदलावे लागतील. “मी कचरा किंवा घाण करणार नाही”. हे प्रत्येकाने मनावर घेण्याची गरज आहे. आपल्या देशात घाणीचे साम्राज्य दिसायला नको त्यासाठी काय करावे लागेल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. तरच आपल्या देशाची स्वच्छ प्रतिमा जगासमोर उभी राहील. आणि घाणेरडा देश म्हणून जगापुढे आपल्याला मान खाली घालण्याची गरज पडणार नाही. तेव्हाच आपण गर्वाने म्हणू शकतो.
ये दुनिया एक दुल्हन
दुल्हन के माथे की बिंदीयां
ये मेरा इंडिया
आय लव्ह माय इंडिया !
सौ. सुनिता तागवान
कवयित्री, लेखिका,समीक्षिका, नाट्यकलावंत, सामाजिक कार्यकर्ती
आरमोरी जि गडचिरोली

