येशू ख्रिस्ताचा जन्म हा ख्रिश्चन धर्मात एक अतिशय महत्त्वाचा व पवित्र प्रसंग मानला जातो. ख्रिश्चन धर्मातील “नाताळ” सण हा मुख्यतः येशूच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्म सुमारे 2,000 वर्षांपूर्वी ज्यू प्रदेशातील बेथलेहेम या छोट्या गावात झाला. या प्रसंगाला ख्रिश्चन धर्मग्रंथ, बायबल मधील नवीन करार मध्ये मोठे स्थान आहे.
येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानले जाते, आणि त्याच्या जन्मास पवित्र उद्देश व भविष्यवाणीने जोडले गेले आहे. जुन्या करारातील अनेक भविष्यवाण्यांमध्ये जगात ख्रिस्त म्हणजेच तारणकर्ता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. त्याच वेळी, इस्राएलमधील लोक रोमन साम्राज्याच्या अधीन होते व मुक्तीची वाट पाहत होते.
मारिया आणि योसेफ या जोडप्याला बाळ येशूचे पालक होण्याचा आशीर्वाद मिळाला. मारिया ही गॅलिली प्रांतातील नाझरेथ गावातील एक साधी तरुणी होती. देवदूत गॅब्रियलने तिला संदेश दिला की ती पवित्र आत्म्याच्या माध्यमातून एक पवित्र बाळाला जन्म देईल. या बाळाला “येशू” असे नाव द्यावे लागेल, कारण तोच लोकांचे पापांपासून तारण करणार होता.
योसेफ हा मारियाचा होणारा पती, एक साधा सुतार होता. त्याला सुरुवातीला मारियाच्या गर्भधारणेबाबत शंका वाटली, परंतु देवदूताने स्वप्नात सांगितल्यावर त्याने हे मान्य केले आणि मारियाची काळजी घेतली.
येशूच्या जन्माच्या काळात रोमन सम्राट ऑगस्टसने जनगणनेचा आदेश दिला. यामुळे प्रत्येकाला आपल्या मूळ गावात जाऊन नावनोंदणी करणे बंधनकारक होते. योसेफ आणि मारिया नाझरेथहून त्यांच्या मूळ गाव बेथलेहेमला गेले. मारिया त्या काळात गरोदर होती आणि प्रवास अतिशय कठीण होता.
जेव्हा ते बेथलेहेमला पोहोचले, तेव्हा सर्व वसतीगृह भरलेली होती. शेवटी, त्यांना एका गोठ्यात आसरा मिळाला. तिथेच, एका साध्या परिस्थितीत, मारियाने बाळ येशूला जन्म दिला. बाळाला कपड्यांमध्ये गुंडाळून गोठ्यातील गवताच्या मांडणीत ठेवले गेले, तिला गव्हाण म्हणून ओळखली जातो.
येशूच्या जन्मानंतर देवदूतांनी आसपासच्या भागातील मेंढपाळांना स्वर्गीय प्रकाश आणि संगीताद्वारे हा शुभवार्ता दिली. देवदूतांनी त्यांना सांगितले की, “आज तारणकर्ता जन्मला आहे. तो बेथलेहेममध्ये आहे. तुम्हाला त्या बाळाला गव्हाणीत गुंडाळलेले पाहायला मिळेल.” मेंढपाळांनी उत्साहाने बाळ येशूला शोधले आणि त्याला वंदन कले.
येशूच्या जन्मावेळी पूर्वेला एक विशेष तारा आकाशात चमकला. पूर्वेकडील तीन ज्ञानी पुरुषांनी या ताऱ्याचा माग काढत काढत बाळ येशूचा शोध घेतला.तो तारा येशू च्या जन्म स्थळी येऊन थांबला.त्यांनी येशूला सुवर्ण, लोभान (धूप), आणि गंधरस (मायरा) अशी तीन मौल्यवान भेटवस्तू दिल्या. या भेटींमध्ये येशूचे राजा, देवाचा पुत्र, व रोगमुक्ती करणारा म्हणून स्थान दर्शवले गेले.
ज्यावेळी हरोद राजा येशूच्या जन्माविषयी जाणून घेतो, तेव्हा तो अस्वस्थ होतो, कारण त्याला आपला सत्तास्थान गमावण्याची भीती वाटते. त्याने दोन वर्षांखालील मुलांचा वध करण्याचा आदेश दिला. परंतु देवदूताने योसेफला सावध केले आणि बाळ येशूला सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबाने मिसर (इजिप्त) देशात पलायन केले.
येशू ख्रिस्ताच्या जन्माला ख्रिश्चन धर्मात मानवजातीच्या उद्धाराचा आरंभ मानले जाते. तो प्रेम, दया, आणि तारणाचा संदेश देण्यासाठी पृथ्वीवर आला, असे ख्रिस्ती धर्म मानतो. येशूचा जन्म अत्यंत साधेपणाने झाला, ज्यातून नम्रता, त्याग, आणि समानतेचे मूल्य अधोरेखित होते.
येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी संपूर्ण जगा मध्ये साजरा केला जातो. हा सण नाताळ वृक्ष, गव्हाण दृश्य, तारे, आणि प्रकाशांनी सजवला जातो. ख्रिस्ती लोक चर्चमध्ये प्रार्थना करतात, स्तोत्रे गातात, आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. नाताळ हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो जगभर प्रेम, आनंद, आणि शांततेचा संदेश पोहोचवतो.
बाळ येशूचा जन्म हा मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे, ज्याने लाखो लोकांच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडवले. त्याचा जन्म साधेपणात झाला असला तरी त्याचा संदेश जागतिक आहे: प्रेम, तारण, आणि देवावर विश्वास. आजही हा प्रसंग लाखो लोकांना प्रेरणा देतो आणि जगाला शांततेकडे नेण्याचे आवाहन करतो.
कवयित्री सौ. पल्लवी संजय आल्हाट
अहिल्यानगर

