prabodhini news logo
Home चंद्रपूर दुष्टचक्रात अडकलेल्या बापाची शोकांतिका : सुयोग रंगभूमीचे ‘जन्मदाता’ नाटक

दुष्टचक्रात अडकलेल्या बापाची शोकांतिका : सुयोग रंगभूमीचे ‘जन्मदाता’ नाटक

0
340

प्रा.राजकुमार मुसणे , गडचिरोली

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ध्रुव थिएटर्स निर्मित सुयोग नाट्य रंगभूमीचे दीपक बोरकर लिखित, विशाल तराळ दिग्दर्शित राणी दुर्गावती महिला नाट्य मंडळ लोहारा आयोजित संगीत जन्मदाता नाटकाचा २८ डिसेंबर२०२४ ला प्रयोग यशस्वी झाला. सुयोग नाट्य मंडळाचे रुसली हळद लग्नाची, हिजडा अर्थात भूक मातृत्वाची ,हेच का माझे बाळ आणि जन्मदाता या नाटकांचे यावर्षी रंगभूमीवर प्रयोग होत आहेत. जन्मदाता हे कौटुंबिक नाटक कर्जबाजारीपणा, शोषण, स्त्रीअत्याचार,व्यसनाधीनता, स्वैराचारीपणा, कटकारस्थान व नातेसंबंध यावर बेतलेले आहे.जन्मदाता या नाटकात पिता आणि मुलांच्या जिव्हाळ्याच्या भावनिक नात्यावर प्रकाश टाकला आहे. तुकाराम-प्रिया, गोपाळराव-संतोष यांच्यातील नात्याचे विविध पदराच्या माध्यमातून कौटुंबिक जीवनदर्शन घडविले आहे. कष्ट उपसणाऱ्या तुकारामच्या जीवनाची होणारी वाताहत , खल प्रवृत्तीच्या गोपाळराव शिंदेमुळे निर्माण होणारे पेच प्रसंग , दोन भिन्न प्रवृत्तीचे बाप, त्यांच्या मनोवृत्ती, स्वभाववर्तन दर्शविले आहे.
तुकाराम हा सर्वसामान्य कुटुंबातील पत्नीच्या मृत्यूनंतर दोन मुलींचा सांभाळ करणारा त्यांच्या सुखासाठी अहोरात्र धडपडणारा शाळेत चपराशी या पदावर कार्यरत परंतु ब्रेन ट्युमरच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर असणारा, त्याची मोठी मुलगी शीतल हिचा भास्करशी विवाह होतो ;परंतु पशुतुल्य प्रवृत्तीचा व्यसनी भास्कर नेहमी तिच्यावर अत्याचार करत असतो. प्रिया ही मुलगी वडिलांच्या प्रकृतीमुळे शस्त्रक्रियेस चार लाखाची पैशाची उभारणी करण्याकरिता श्रीकांतवरील प्रेमाचा त्यागकरीत गोपाळराव शिंदे यांच्या वैफल्याने वेडसर झालेल्या मुलासोबत लग्न करण्याची अट मान्य करते. तिच्या जीवनातील अवहेलना, हेडसांड ,सोशिकपणा नाटकातून दर्शविला आहे. भावजी भास्कर व सासरे गोपाळराव शिंदे हे प्रियावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, शरीर सुखाची मागणी करतात. ती व्यभिचारी असल्याचे नाटक करतात. या सर्व अग्नी दिव्यातून प्रिया स्वतःला सावरीत परिस्थितीला तोंड देत बाहेर पडते आणि वैफल्यग्रस्त मनोरुग्ण पती संतोषला माणसात आणून सुखी संसार थाटते. शीतलचे भास्करशी विवाह झाल्यानंतरही व्यभिचाराने अभिजीतशी प्रेमसंबंध व गर्भधारणा यामुळे पिता तुकाराम सर्वस्व गमावल्याच्या दुःखाने व्याकुळतेने हतबल होतो. एकीकडे तुकाराम आपल्या मुलींसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा कुटुंबवत्सल,प्रामाणिक, स्वाभिमानी तर दुसरीकडे गोपाळराव शिंदे स्वतःच्या सुखासाठी मुलाचा बळी घेणारा, मुलाच्या होणाऱ्या पत्नीवर बलात्कार करणारा, सुनेवर अत्याचार करणारा दुष्ट प्रवृत्तीचा कटकारस्थानी आहे. शाळेचा संस्थापक शिंदे कर्मचाऱ्यांची शोषण करणारा, व्याजाचा व्यवसाय करणारा ,तुकारामच्या शस्त्रक्रिया संबंधित कट रचणारा विकृत मनोवृत्तीचा आहे.
जगातला सगळ्यात लाचार बाप असल्याच्या आंतरिक वेदनेने अगतिक झालेला तुकाराम ही व्यथा कुणाजवळ मांडू ?असा आर्त टाहो फोडतो ,तेव्हा मात्र डोळे पाणावतात. सासरे शिंदे यांच्या दुष्टचक्रात अडकून वडिलांची प्रतारणा करणारी प्रिया , तळहाताच्या फोडासारखे जपणाऱ्या बापाला ती विसरते ,त्यांचा घोर अपमान करत हाकलते. प्रियातील हा वर्तन बदल विसंगतच. दृष्ट गोपाळराव शिंदे सुगंधावर बलात्कार करून तिची हत्या करतो.बनावट कटकारस्थानात सहभागी असलेल्या श्रीकांत शिंदेंना अडीच लाखाची कमिशन मागतो त्यावेळेस शिंदे त्याचा खून करतो. सुनेला मारण्याच्या प्रयत्नात वैशालीचा मृत्यू होतो. शितल चहा तुम्हीच मिशन भास्करला देते त्या त्याचा मृत्यू होतो. श्रीकांतने धिक्कारल्यावर शीतल विष प्राशन करते. एक मुलगी मृत्यूला कवटाळते तर दुसरी बापालाच नाकारते ,यामुळे उद्विग्न झालेला तुकाराम पूर्णतः खचतो. जन्मदात्या बापाची अगतिकता, हतबलता, उद्विग्नतेची व्यथा नाटकातून प्रत्ययास येते.
गोपाळराव शिंदे (वासू कुमार) यांचा विलक्षणआंगिक अभिनय, तुकाराम ( विशाल तराळ) यांची आंतरिक तडफडीच्या भावावस्थेचा जिवंत अभिनय, उपकार नाकारणारी स्वाभिमानी प्रिया (भूमिका दुपारे ) हिची अस्वस्थता, भास्कर (के.रवी कुमार) यांचे दारुड्याचे झिंगणे, श्रीकांत (अभिजीत शेंडे) सुमधुर गायन व बदफैलीपणा, अत्याचार ग्रस्त शीतल (नैना), लोभी वैशाली, नर्तिकी सुगंधा (प्रीती मरस्कोले), सुगंधाच्या विरहाने तडफडणारा वैफल्यग्रस्त संतोष (सागर सहारे), गुल्ल्या (विकास गुरूनले) व परशुराम (पी लालचंद) यांचा हशा पिकविणारा विनोद अनुभवण्यासाठी व भूमिका आणि प्रीतीचे दिलखेचक अदाकारी नृत्यासाठी जन्मदाता हे नाटक पाहायला हवे. माझे नाव परशुराम मी करतो चोरीचे काम ,’पटलं तर पटलं नाही तर पेटलं’, हे गोपाळराव शिंदेंचा भारदस्त आवाजातील पालुपद वैशिष्ट्यपूर्ण.

‘ जन्मदाता ‘ या नाटकातील गीतेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.’अनुभवलेला क्षण तो सुखाचा’,
‘तुझ्यावर प्रीत जुळली रे सजना,
तुझ्या प्रीतीत न्हाहून भिजलो…तुझ्या प्रेमात पडलो ग,
नसतो खेळ हा संसार सारीपाट सोंगट्याचा’,
वाऱ्याच्या वेगाने आली, तुझ्या प्रीतीने धुंद झाली, या चित्रपट गीताचा समर्पक केलेला वापर,
ओठो पे लाली, बालो मे गजरा’, रातभर जागली विचारात तुमच्या पाहूणं या बसा राजसा मी करते तुम्हाला मुजरा’ ही लावणी,
‘आली घरी तू लक्ष्मी पावलांनी ,माझी सजनी लाजते कशी मला पाहुणी ‘या गीतांबरोबरच
” विसरूनी भान त्यागीला स्वाभिमान
महान तुझी गाथा असा तू जन्मदाता ,
घर असुनी बंगला माळा काळजाच्या तुकड्यासाठी
अशी कशी विसरू माया जन्मदात्याची,
सुख त्यागले, दुःख सोसले झिजला पिल्यांसाठी,
नर असुनी बनला माता काळजाच्या तुकड्यासाठी “या असे आशयसूचक शीर्षक गीताने प्रयोगात रंगत आणली. याकरिता ऑर्गन राहुल सहारे, ॲक्टोपॅड सुनील मोहुर्ले ,तबला बाळू कावळे यांची उत्तम संगीत साथ लाभली. प्रयोगाकरिता लोमेश कोलते आणि निर्माता देवा शेडमाके सर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
‘जन्मदाता ‘या नाटकातील प्रसंगनिष्ठ विनोदही महत्त्वपूर्ण आहे. गुल्या व परसराम यांच्यातील शाब्दिक जुगलबंदीने प्रेक्षागृहात हशा उसळतो. कचकतो, फलकवतो ,तोरांडत आहे ,साऊंड सर्व्हिस, वारे पट्ट्या, डुक्कर – गेंडा ,चुंबन थेरपी, कुचकच, मातीखुंदे, पैसे चोर,आंधळा परशुराम विविध शाब्दिक कोट्याने प्रेक्षक हसायला लागतात.
तुकारामची व्यथा उत्तमरीत्या सिने कलावंत विशाल तराळ यांनी साकारली आहे. डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असा संदेश दिला परंतु आज हे दूध इतके भाग झाले आहे की ते एकही थेंब घेऊ शकत नाही, ही विदारतता मांडून प्रेक्षकांना अंतर्मुखते बरोबरच विचारप्रवृत्त केले जाते.
एक बाप आपल्या मुलीच्या सुखासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारा तर दुसरा बलात्कारी – खूनी, गरीबाचे रक्त पिणारा, एक जन्मदाता आपल्या मुलीसाठी कष्ट करतो तर हा दुसरा जन्मदाता आपल्याच मुलाचे जीवन नष्ट करतो, एक जन्मदाता आपल्या मुलीला आदर्शांचे, स्वाभिमानाचे गोडवे सांगतो तर हा दुसरा जन्मदाता स्वतःच्याच मुलाची दिशाभूल करत कटकारस्थान करणारा खुनी, “काय म्हणावे या जन्मदात्याला? माझे मायबाप हो , तुम्हाला जन्मदाता बनायचं असेल तर असे ( तुकाराम सारखे) बना, तर असा असतो जन्मदाता,” हा संदेश नाटकातून देण्यात सर्व कलावंत यशस्वी ठरले. दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या जीवनाशी निगडित जन्मदाता नाटक आहे.

प्रा.राजकुमार मुसणे ,गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here