तुझ्या डोळ्यात दिसते
मला दिपूर चांदणे
तुझे भाव विश्व छान
नाही त्याचे काही उणे।।१।।
तुझ्या सौंदर्याची तुलना
सांग करावी कोणाशी
दिसे चांदणे डोळ्यात
आणि जग माझ्या पाशी।।२।।
तुला रागात बसवू
येते ओठावर गाणे
मन हळूच छेडीतो
नवे प्रीतीचे तराने।।३।।
रात्र काळी ही सुंदर
आज दिसे तुझ्यामुळे
तुझ्या गालावर आले
प्रेम चंद्राचे ते खळे।।४।।
रूप तुझे ग गोजिरे
माझ्या मनात भरले
तुझ्या रूपाचे चांदणे
माझ्या उरात पडले।।५।।
अवतीभोवती तुझा
लाभे मला सहवास
कोणी तुझ्या ग एवढे
आता कोणी नाही खास।।६।।
रोज चांदणे फुलते
तुझे यौवन घेऊन
मुख चंद्र दिसे तुझे
मज बेभान होऊन।।७।।
तुझा लाभे सहवास
मन आनंदून जाई
तुझ्या प्रेमाच्या जगात
खरी आहे नवलाई।।८।।
जरी दूर तू असली
वाटे मनाचे गोंदणे
माझ्या मनाच्या मंदिर
पडे टिपूर चांदणे।।९।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

