लेखक – प्रा. राजकुमार मुसणे
श्री. गुरुदेव रंगभूमी वडसा प्रस्तुत कल्लू शिंगरे निर्मित गोपी रंधये दिग्दर्शित दिलीपकुमार वडे लिखित ‘माऊली’ अर्थात तपस्या या नाटकाचा प्रयोग सम्राट नवयुवक मंडळ चांदेश्वर (वायगाव) जि. गडचिरोली यांच्या सौजन्याने ३० जानेवारीला यशस्वीरित्या संपन्न झाला.
कुटुंबीयांच्या कल्याणासाठी स्वतः वैवाहिक बंधनात न अडकता त्यागीवृत्तीने, समर्पित भावनेने बहिणीने केलेल्या कर्तुत्वाची महती सांगणारे हे नाटक आहे.भावांच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी बहीण गौरीच्या कर्तुत्वाची गाथा,स्वार्थी भाऊ, समाजातील गुंड, अत्याचारी , संस्थाचालकाकरवी शोषण, डोनेशन,महिलांवरील अत्याचार तसेच समाजातील विविध प्रवृत्तीचे दर्शन नाटकातून घडते.झाडीपट्टी क्षेत्रात नाटककार दिलीपकुमार वडे यांचे नाव सकस, कसदार प्रतिभासामर्थ्यांने वेगळा नाट्याशय लिहिणारे म्हणून लौकिक प्राप्त आहे. ‘शापित सौंदर्य’ या नाटकापासून त्यांची सुरू झालेली झाडीपट्टीतील वाटचाल आज आहुती,पिंजरा, विध्वंस,आसूड, बाई आवडते बुवाला, पेटली मशाल क्रांतीची ,अग्रीकुंड, वंदे मातरम, घेऊन जा गे मारबत ते माऊली अशा तब्बल चाळीस एका पेक्षा एक सरस नाट्यकृतीमुळे यशस्वी ठरली आहे. चतुरस्त्र नाटककाराच्या समर्थ लेखणीतून साकारलेली तीन अंकी संगीत’ माऊली’ ही नाट्यकृती सुद्धा यातील प्रभावी आशयसूचक संवाद लेखन, पात्रातील विविधता व त्यानुरूप भाषा, ड्रायव्हरच्या क्षेत्रातील विनोद निर्मिती व कसदार कलावंतांची प्रभावी अभिनयशैली इत्यादी वैशिष्ट्यामुळे प्रचंड रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत नाट्यप्रयोग यशस्वी ठरला. शिवाय बहिणीच्या त्यागाची महती सांगणारी कौटुंबिक, सामाजिक नाट्यकृतीही अव्वल दर्जाची आहे.
गौरीचे प्रदीपवरील निस्सीम प्रेम ,कुटुंबीयांच्या जबाबदारीमुळे लग्नास विरोध, भावांना शिकविण्यासाठीचा प्रयास, नोकरीसाठीची धडपड, संस्थापकाकडे याचना,भावांच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठीचा त्याग, दुष्ट वासनांध स्वप्निल नारंग नराधमाचा अत्याचार त्यातून गर्भधारणा, कुटुंबीयांच्या मनात शंका-कुशंका, आळ, हातपाय बांधून अत्याचार ,बाळासाठीचा आकांत, रक्ताच्या नात्यातील स्वार्थीपणाचे बदल, संपदाला मुलाची आवश्यकता, त्यासाठी गौरीवरील अत्याचार- अन्याय, जन्मदात्या बाळाविषयीची विरहभावना, स्पर्शाचे वेड , टाहो अशा विविध अंगाने हे नाटक साकार होते.आईचे लहानपणीच निधन, वडील दारुडे, लाकूडतोड्याचा व्यवसाय करणारा जग्या भाऊ ,पंख फुटताच स्वमर्जीने श्रीमंताच्या मुलीशी लग्न करणारा लहान भाऊ पंकज, गौरीचा छळ करणारी संपदा, गौरीवर बलात्कार करणारा दुष्ट स्वप्नील नारंग, तिचे हात पाय बांधून छळ करणारे , मारणारे , अवहेलना करणारे भाऊ -वहिनी नाटकांत दर्शविले आहे. गरीब पण ध्येयनिष्ठ होतकरू पंकजवर संपदा प्रेम करते. पंकजला आपल्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे तो माझे सर्वस्व ताई असल्याचे तिला निक्षून सांगतो. किंबहुना ताईनी हालाअपेष्टा सहन करून स्वतःच्या इच्छा -आकांक्षांना मुरड घालून वाढवलं ,शिकवलं, तुझ्या अफाट संपत्तीपेक्षा ताई ही माझी अनमोल संपत्ती आहे’, असे म्हणत संपदाला झिडकारतो परंतु संपदा मात्र तुझे भूतलावरचे दिवस संपले समज असे म्हणून धमकी देते. संपदाला पंकज आपला हस्तक हातातील बाहुले , म्हणेल ते ऐकणारा म्हणून हवा असतो. पंकजही तिला बळी पडतो. पत्नीचे एकूण कुटुंबीयांची हेटाळणी करतो. देवता समान ताईला झिडकरतो,तिचा छळ करतो.
सौंदर्याचा, श्रीमंतीचा अतिमाज काही कामाचा नाही नियतीसमोर सर्वालाच शरण जावे लागते,पंकजवर प्रेम करून वैवाहिक जीवन सुखी घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संपदाचा अपघात होतो आणि मातृत्व कायमचे गमावून बसते.हे संपदाच्या कॅरेक्टरमधून नाटककाराने दर्शविले आहे.
भावासाठी स्वतःच्या इच्छा- आकांक्षा बाजूला ठेवत समर्पित भावनेने धडपडणारी , पदव्युत्तर शिक्षण घेतलेली प्रशिक्षित, शिकवणी घेऊन अर्थाजन करणारी त्यागी गौरी (वर्षा गुप्ते), उच्च शिक्षण घेऊन संस्थेत नोकरी करणारा आणि गौरीवर प्रेम करणारा प्रदीप ( महेंद्र भिमटे), गरिबीने खंगलेला परंतु जगण्यासाठी लाकूड तोडून उपजीविका करणारा परखडपणे जगणारा बोलणारा जग्गू (मुकेश गेडाम), एमएससी ,बी.एड. झालेला उच्चशिक्षित पंकज रघुनाथ राणे (स्वरबाहर निखिल मानकर), श्रीमंतघरची, ऐशोआरामात वाढलेली सौंदर्यसंपन्न , बोलेल ते खरे करणारी जिद्दी , नाटकी,हट्टी संपदा ( शुभांगी राऊत), राजकारणांचे तळवे चाटून माया जमवणारा तथा शैक्षणिक संस्था उभारून डोनेशनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे शोषण करणारा दुष्ट प्रवृत्तीचा, नीच, स्त्रीलंपट व्यभिचारी स्वप्निल नारंग (डॉ .राज मराठे), व्यसनाधीन, व्यसनपूर्तीसाठी विविध क्लृप्ती आखणारा रघुनाथ ( तुषार बारसागडे), खटकेबाज ड्रायव्हरच्या व्यवसायातील संवादांनी रसिक प्रेक्षकांना हसवत खुर्चीला खिळवून ठेवणारा नाऱ्या(विनोदवीर गोपी रंधये), स्वप्निल नारंगकडे नोकरी करणारी दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची रेखा (तेजस्विनी खोब्रागडे,), प्रेमासाठी आसुसलेली बिनधास्त रंभा (दीपाली भराडे), दोन मुलींच्या संगोपन व रक्षणासाठी आटापिटा करणारा बाजीराव (विनोदवल्ली कल्लू शिंगरे) या पात्रातील संवादातून नाट्य घडते. प्रत्येक पात्र आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व साकारत कसदार अभिनयाने जिवंत करण्यात यशस्वी ठरले. प्रवाही भाषा, खटकेदार प्रभावी संवादामुळे माऊली हे नाटक रसिक मनाची पकड घेणारे आहे.
नाटकातील गीत रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
तुझ्या मनातील कोडं उलगडू दे थोडं ‘, सागराची माया कशी माझी माऊली’, तुझ्या डोळ्यात माझं घर शोधतो हृदयाच्या मंदिरी तुला पुजतो’, चंदनापरी झिजली व्यथा तुझी ही माऊली’, या गीता बरोबरच ‘बाळा तुझ्याचसाठी ममता मुखी माऊलीची जशी गाय वासराची’अर्थता दर्शविणारे हे गीत अंत:करण हेलावणारे होते.’मजवरी झाले वार घेतलेस तू झेलून घाव जगाचे शोषण माझे केलेस पोषण ‘ उभ्या जन्माची पुण्याई अर्पितो मी तुझ्या पाऊली, चंद्र सूर यांनीही करावी पूजा तुझी आदराने, तुझ्या प्रेमाची पोवाडे गावे हिम पर्वताने, तुझ्या त्यागाची ही गाथा माझ्या हृदयावरी कोरली, माऊली ..माऊली’हे शीर्षकगीत पार्श्वगायक स्वरबहार जय बावनथडे यांच्या गायनाने अंतर्मनाचा ठाव घेणारे ठरले.
नाट्यशय प्रभावीपणे व्यक्त करणारे गीते आहेत. इंजि. सौरभ रंधये रचित,’काऴीज झालं खुळं न मी केला शृंगार तुमच्यामुऴ’ या लावणी बरोबरच ‘नाजूक नाजूक तुज गोरं गोरं अंग, गोऱ्यामधी इश्काची भूल पडली’, ‘रहा दिल्याच्या माडीत एक नंबर, दिसते साडीत फुलाच्या गाडीन’, होऊ दे स्पर्श तुझा बघणार नाही कुणी,अशा विनोदी गीताने नाट्यप्रयोगात रंगत आणली.पुरुषोत्तम दडमल, किशोर जोंधुळकर, जय बावनथडे यांची संगीतसाथ नाट्यप्रयोगात सरसता निर्माण करीत श्रवणीय ठरली.
माऊली या नाटकातील प्रसंगनिष्ठ विनोद हास्याचे फवारे उडविणारा आहे. हल्ला, अणुबॉम्ब, ताप ,येलपाडे , स्पोर्ट अंडरग्राउंड एमपी- माणूस पारखी, नारूचे आंमरण उपोषण, वेशांतर या हास्य निर्माण करण्याबरोबरच ड्रायव्हर क्षेत्रातील
एकच मालकाच्या दोन गाड्या, चेसिस बेंड, इंजिन गरम, मीटर, गाडी सर्विसिंग ,बॅटरी, धक्का ,ऑइल पाणी, स्पीड, रिव्हर्स घेर , स्पीड ब्रेकर, मोसम, या शब्डॉच्चाराने विनोद निर्माण केला जातो.
घरात राहून बाहेर उजेड पाडणे ,एका जन्मात सात नवरे करणारी मेनका, आवं तू जाणा वं, अशा विलक्षण संवादाने विनोद निर्मिती होते. एकूणच झाडीपट्टी नाटकातील पारंपरिक ढाचातील पात्र व प्रसंग यातील नाविन्यतेने विनोदाचे बदलते स्वरूप माऊली हे नाटक गडदपणे दर्शविते.
माऊली हे दिलीप वडे यांचे नाटक संवादातील विलक्षणतेमुळेही सरस ठरले. ‘प्रेम विकत मिळत नाही हृदयात फुलावं लागतं’,’ वळणावर दोन वाटा फुटल्या पण भावना अभंगा आहेत’, अशा प्रभावी संवाद रसिकप्रेक्षकांच्या अभिरुची समृद्धतेत भर घालणारे आहेत.
कायम अविवाहित राहण्याचा निर्णय घेत, स्वतः हाल- अपष्टेने जगत व्यक्तिगत इच्छा आकांक्षांना मुरड घालून लहान भावांच्या जीवनासाठी सर्वस्व अर्पिणारी गौरीताई, रक्त देणारी तपस्विनी म्हणजेच माऊली होय. संपदा गौरीला भिकारी म्हणून लाथाडते, बाळासाठी गौरीचे हात पाय बांधून ठेवते मारहाण करते पाणीही देत नाही प्रचंड छळते.जगन्याला हात्तीउतार, सांड्या म्हणून हेटाळणी करते. पंकजला लग्न करून विकत घेतला ,बस खाली, बोललेलं खपवून घ्यावं लागेल, ऐकावंच लागेल असे ठणकावत त्याच्यावर शिरजोरी करणारी वर्चस्ववादी प्रचंड अहंकारी आहे. पाच वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेला पंकज लग्नानंतर बायको येतात प्रचंड बदलतो. कधीही वाढदिवस न विसरणारा मायेचा ओलावा आटत ताईलाही विसरून जातो. रेखा मात्र जग्गूला गौरीच्या बाळाविषयी स्वप्निलने सरबतात गुंगीचे औषध टाकून बलात्काराचा सर्वप्रकार सविस्तर सांगत डोळस करत वास्तवाची जाणीव करून देते.
गौरीचा आकांत, जिंदादिल जगन्याचा सडेतोडपणा, संपदा च्या गालावर मारलेली चपराक, किचनमधून बाहेर येणे, व्यसनपूर्तीसाठी रघुनाथचे विविध बहाणे, तरुण वयात आलेल्या पोरी म्हणजे विषयाची पुडी अशा मुलीच्या संगोपन, इज्जतीसाठी बाजीरावची विलक्षण काळजी, ड्रायव्हर नाऱ्याचा वेष, रेखा रंभाचा बिनधास्तपणा, गौरीची काहीली, तळफळाट, संयमी प्रदीपचा अपराधीभाव, बैल पंकजची अगतिकता, स्वप्निलचा धूर्तपणा आणि संपदाचा अहंकार अनुभवण्यासाठी माऊली हे नाटक अवश्य पाहायलाच हवे.

