आगमन वसंताचे
आला फुलांचा बहर
पान गळत सरली
आला आंब्याला मोहर।।१।।
आगमन वसंताचे
नवं पालवी फुटते
पाना अडून कोकीळ
कुहुकुहू ग बोलते।।२।।
आगमन वसंताचे
मन प्रसन्न दिसते
जातो शिशिर संपून
नवी पालवी हसते।।३।।
आगमन वसंताचे
मन मोहरून गेले
ढग भेटण्या धरती
आज आतुर हे झाले।।४।।
आगमन वसंताचे
ढग दाटले आकाशी
कसे खोलावे हे गुज
मन बोलते मनाशी।।५।।
आगमन वसंताचे
कंठ पक्षाला फुटला
फिरे मनाचा पारवा
आज साजन भेटला।।६।।
आगमन वसंताचे
मनी हुरहूर लागे
रूप पाहण्या धरेचे
झाली पान फुले जागे।।६।।
आगमन वसंताचे
आज येईल साजन
रूप माझ्या ग धन्याचे
मीच डोळ्यात भरीन।।७।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

