लोकार्पित झालेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवीन दालन ठरेल – आ. किशोर जोरगेवार

0
52

स्थानिक विकास निधीतून साकार झालेल्या तुकूम येथील अभ्यासिकेचे लोकार्पण.

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शिक्षण हा समाजाचा कणा आहे. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना योग्य सुविधा, प्रेरणादायी वातावरण आणि अभ्यासासाठी आवश्यक साधने मिळणे गरजेचे आहे. ही अभ्यासिका त्याच उद्देशाने उभारली आहे. येथे विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल, मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचे शैक्षणिक जीवन अधिक सुलभ होईल. आज लोकार्पित झालेली ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवीन दालन ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तुकूम येथील आश्रय कॉलनी, चवरे-ले-आउट येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत नव्याने बांधलेल्या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डि. के. आरीकर, वर्षा कोटेकर, सविता बांबोडे, संक्षिता शिंदे, शुभांगी डोंगरवार, भावना अल्लेवार, वैशाली रोहणकर, संगीता मालेकर, पुष्पा तपासे, वैशाली इंगळे, शालिनी तपासे, अमोल शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, महागड्या खाजगी अभ्यासिकांचे दर वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना त्या परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे मतदारसंघात ११ अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. आज ११ पेक्षा अधिक अभ्यासिकांचे काम मतदारसंघात सुरू असल्याचा आनंद आहे. यातील अनेक अभ्यासिका आपण विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या पवित्र दीक्षाभूमी येथेही आपण १ कोटी रुपयांतून अभ्यासिका तयार केली असून जवळपास ३०० विद्यार्थी येथे विनाशुल्क अभ्यास करतात. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड आहे, मात्र शासकीय संसाधनांची कमतरता आहे. त्यामुळे आता आपण गरज असलेल्या ठिकाणी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
आजचा हा दिवस आश्रय कॉलनी, चवरे-ले-आउट, तुकूम परिसरासाठी अत्यंत आनंदाचा आहे. स्थानिक विकास निधी अंतर्गत नव्याने बांधलेल्या या अभ्यासिकेचे लोकार्पण करताना मला विशेष आनंद होत आहे. ही केवळ एक इमारत नाही, तर येथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मंदिर आहे. जिथे ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होईल आणि भविष्यातील पिढ्या उज्ज्वल भविष्य घडवतील. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच एकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचीही गरज असते. ही अभ्यासिका केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. येथे विविध उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत राहतील, ज्यामुळे संपूर्ण परिसराला त्याचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here