प्रा. राजकुमार मुसने
विद्यमान समाज जीवनातील विविध घडामोडींचे व समाजभानाचे प्रत्ययकारी दर्शन ‘अत्याचार’ नाटकातून प्रा.धनंजय ढवळे या नाटककाराने मार्मिकपणे घडविले आहे. सरकारी यंत्रणा विक्रीस काढून सर्वत्र खाजगीकरणाचे सावट पसरत असल्याच्या वास्तवाने बदलत्या काळाचे समाजभान नाटकातून दर्शविले आहे. किंबहुना त्यामुळे देश हा लोकशाहीकडून हुकूमशाहाच्या हातात जाऊन गुलामगिरीकडे मार्गक्रमण करीत असल्याचे नाटककाराने सुचविले आहे. स्वाभाविकच खाजगीकरणामुळे हुकूमशाही बळावत जाऊन लोकशाही ही उद्योगपतीच्याच हाती जात संपुष्टात येईल. सर्व सूत्रे जेव्हा धनाढय उद्योगपतींच्या हाती जाताच परिणामी अन्याय -अत्याचाराचा अतिरेक होईल. अर्थातच हुकूमशहा इथले वर्चस्ववादी बनतील .अशा प्रकारची चर्चा करणारे अत्याचार हे वैचारिक चर्चा नाटक आहे. महामानवांच्या सामाजिक प्रबोधनाच्या परिवर्तनवादी विचारांन्वये मार्गक्रमण करीत वाटचाल केल्यास निश्चितच भवितव्य चांगले राहील. परंतु सत्ता आणि संपत्तीच्या बळावर सर्वाधीश हुकुमशाह होऊ पाहणारा उद्योगसम्राट नागनाथ नागेश्वर या पात्रांच्या माध्यमातून नाटककार प्रा.धनंजय ढवळे यांनी बदलत्या राजकीय , सामाजिक परिस्थितीचे दर्शन या नाटकातून घडविले आहे.
त्र्यंबक पाटील बुदे स्मृती प्रतिष्ठानच्या रंगकर्मी रंगभूमी वडसा प्रस्तुत, नीतू पाटील बुद्दे निर्मित,धनंजय ढवळे लिखित, सिने. नरेश गडेकर दिग्दर्शित,संगीत तीन अंकी’ अत्याचार ‘या नाटकाचा प्रयोग सार्वजनिक नाटय मंडळ चेक लिखितवाडाच्या सौजन्याने ९ फेब्रुवारी २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला.उद्योगपतीच्या वर्चस्ववादीवृत्तीमुळे समाजातील अबला शेतकरी -कामगारांचे सर्व बाजूने शोषण करणाऱ्या अत्याचारी नागनाथ नागेश्वर या मुख्य खल पात्राशी केंद्रित अत्याचार हे नाटक आहे. पारंपरिक शेती करून उपजीविका करणाऱ्या आबासाहेब नापिकी व दुष्काळामुळे हैराण झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी , मोठ्या मुलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी व लहान मुलांच्या शिक्षणासाठी हतबल होत नाईलाजाने नागनाथकडून कर्ज घ्यावे लागते . दरवर्षी शेतीतील नापीकीमुळे कर्ज फेड करता येत नाही. आबासाहेबांची घोर निराशा होत जाते. ऊराशी बाळगलेल्या स्वप्नाप्रमाणे पीकही वाहून जातं, दुष्काळ, रोगराई या चक्रव्यूहातून शेतकरी बाहेर पडत नाही परिणामी कर्जाची व्याज रक्कम दिवसागणिक वाढत जाऊन वीस हजाराची रक्कम दोन लाखापर्यंत पोहोचवली .हे ऐकून आबासाहेबांना धक्का बसतो. पीक विकून घेतलेले कर्ज वाड्यावर आणून दे नाहीतर शेतीवर कब्जा करील अशी धमकीही नागनाथ देतो. परतफेड करण्याकरिता जवळ रक्कम नाही आणि नागनाथला जमीन हडप करायची असल्यामुळे तो आबासाहेबांना विष देऊन मारतो.भावाच्या मृत्यूचा कारक ठरणाऱ्या नागनाथला जाब विचारायला गेलेल्या आनंदवर नागनाथ चाकूने हल्ला करतो, सविताचे बाळ पोटात असताना तिच्यावर अत्याचार करतो, त्यातच गर्भातील बाळ दगावते , लक्ष्मीवर बलात्कार करतो, तिच्या उदरात बाळ वाढत असल्याचे माहीत होताच तिलाही संपवितो.स्वतःच्या फॅक्टरीतील मजुरांना कामावरून काढून टाकणारा, गरीब मजुरांसाठी ,कामगारांकरिता बंड करणाऱ्या रहीमला हाकलून देणारा,शेतातील उभे पीक जाळून टाकणारा विध्वंसक प्रवृत्तीचा नागनाथ नागेश्वर आहे. तद्वतच श्रीमंत उद्योगपतीचे स्वप्न पाहणारा पारिजातकासारख्या सुंदर ललनांना शेज सजवण्यासाठी पाचारण करणारा पाशवी नराधम ,दुष्कृत्याचा दुसरं नाव ,सभ्यतेचा बुरखा पांघरून विघातक कृत्य करणारा, अनाथाचा नाथ नागनाथ आणि ज्याच्या करणीने थरथरतो ईश्वर असा नागेश्वर असे अहं भूमिका बाळगणारा, प्रचंड अहंकारी, दडपशाही वृत्तीचा, कायदा, सुव्यवस्था, सरकारी यंत्रणा ही केवळ उद्योगपतीच्या हाती असली पाहिजे अशी तीव्र महत्वकांक्षा असणारा हुकूमशाह म्हणजेच नागनाथ नागेश्वर (सिने. नरेश गडेकर), शेतीवर प्रेम करणारा कष्टकरी, प्रेमळवृत्तीचा आबासाहेब(उमेश जाधव), कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी धडपडणारा आनंद (उमेश जाधव), कुटुंबवत्सल, स्वाभिमानी ,संघर्ष हा बाणा सांगणारी प्रसंगी अत्याचाराच्या विरोधात आक्रमक रूप धारण करून न्यायासाठी धडपडणारी रणरागिणी सविता (सिने. आसावरी तिडके), स्वतःच्या करिअरसाठी प्रचंड परिश्रम करून पोलीस उपनिरीक्षक बनणारा व अन्याय निवारण्यासाठी पुढाकार घेणारा अभय ( देवा बोरकर), जात, धर्माच्या पलीकडे माणुसकी धर्म महत्त्वाचा मानणारा आणि हिंदू मुलगी लक्ष्मीला बहिणीप्रमाणे सांभाळणारा, अभयला मदत करणारा, किंबहुना कामगारांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारा, बंडाचा झेंडा फडकवणारा कामगार हितासाठी न्यायासाठी सतत धडपडणारा रहीम (स्वर.अमर कुमार मसराम), श्रीमंत घरात जन्माला आलेली अभयवर प्रेम करणारी,कायद्याच्या शिक्षणाने कुटुंबीयांच्या संरक्षणाबरोबरच योग्य मार्गाने जाण्यासाठी प्रसंगी माफीही मागणारी नंदिनी (श्रुती निकोडे), मोठ्या भावाच्या प्लॅनला यशस्वी करण्यासाठी धडपडणारा चतुर प्रलय (सदानंद पिल्लारे ),प्रेम जाळात अडकलेली लक्ष्मी (प्रिया श्रीरामे), दुखमंजन कंपनीचा अजब विक्रेता, प्रसंगनिष्ठतेने स्थानिक संदर्भ देत बुद्धीचातुर्याने हास्योत्पादक प्रसंगाने, विविध पंच मारत प्रेक्षकांना हास्याचे भवारे उडविणारा विनोदवीर (रत्नदीप रंगारी ),विविध छटाने हसविणारा (पोपटलाल) निशांत अजबेले, नृत्यांगना सुगंधा (रेश्मा रंभाळ) या पात्रांच्या माध्यमातून सकस कलावंतांच्या अभिनयाने, दिग्दर्शकाच्या कल्पकतेमुळे नाट्याशय समर्थपणे दर्शविण्यात मंडळ यशस्वी ठरले.
नाटकातील विनोदही लक्षणीय आहे. पारंपारिक विनोदाचा बाज टाळत दंतमंजन विक्रेत्याच्या विनोदाने विनोदवीर रत्नदीप रंगारी व निशांत अजबेले यांच्या जुगलबंदीने प्रयोगात चांगलीच रंगत आणली . आता घेता का मंजन ,दहा रुपये देता का, सातबारा कोरा, नमुना आठ ,डांबरतोंड्या, मस- हाल्या, जांगडगुत्ता, घुबरा फुटला, बाई – एक हजार धानाची लाही, चायना मॉडेल अ आ इ, देवा माझ्या, देवा बिन नवऱ्याला मारीन खरा खरा , रंगीबेरंगी बांगड्या दुधी भट इंडिया घासू , लटाऱ्या, टेट्रा, फुसनाड्या, चोंगल मिट्टू, पाडाचा आंबा मस्त लागते, मार्बल, पाच फुटाचे गड्डे, चूरपून, पिल्लारी कोंबडी , लचांड अशा हास्यौत्पादक शब्दोच्चाराने हास्याचे फवारे उडवत मजेशीर रंगत आणली.
देवा माझ्या देवा तू नेट पॅक मारना,आणि माझ्यासाठी बायको तू डाउनलोड मारणा,… मी माझ्या बहिणीला राखीला नेतो आणि पोरा करून वापस घेऊन येतो… म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नाही सोयऱ्या आता चार-आठ दिवसावर राखी आहे तर मी माझ्या बहिणीला राखीला नेतो आणि कानोबा पोळा झाला किंवा वापस आणून देतो असा म्हणत होतो , अशा द्विअर्थी संवादाने तथा ‘सखे साजणी येना ग ,मिठीत धरून मजला, तू घेना ग, कळी कोवळी, नाजूक जशी, खोबरं खूठूर खुठूर, पाहू नको टुकुर टुकुर ग, सजनी पाहू नको टुकुर टुकुर. असे विनोदी गीत गाऊन रत्नदीप रंगांरी य विनोदवीराने प्रेक्षकांना चांगलेच हसवत धमाल केली.निशांत अजबेलेने मकरंद अनासपुरे, जॉनी लिव्हर देवेंद्रजी फडणवीस यांच्या मिमिक्रीने व रत्नदीप रंगारी यांच्या स्त्रीवेशाने, वेशांतराच्या गमतीदार संवादाने व हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्ष खळखळून हसले.
अत्याचार या नाटकातील गीतरचना ही श्रवणीय व नाटयाश्यात रंगत आणत परिणामकारकता साधणारी आहे.’ आनंदाची आज पर्वणी गगन जणू ठेंगणे ‘, हसऱ्या या चेहऱ्याने मधुरिया बोलण्याने’, कळी मोगऱ्याची आज घरातून गेली’, स्वप्नसुखाच्या संसाराला गाल बोट ही कुठे नसे’, चौपाटी फिरायला बोटीत बसायला वडापाव खायला मुंबईला, हृदयी तुझ्या ग भिरभिरणारा स्पर्श असा लाजरा साजणी प्रीतीचा हा सुटलाय वारा’, अशा सुमधुर श्रवणीय असे संपन्न गीता बरोबरच,’ धडधड होते काळीज सोडा की हात माझा दाजीबा, ही लावणी तथा ‘हम तेरे शहर मे आये मुसाफिर की तरह’,” देव समजूनी पुजले ज्याला, तेची करीती प्रहार ,..करतो अत्याचार’, नियतीने हा डाव उधळला असा ,हा डाव मोडला असा जीवनात माझ्या कसा वादळ हा सुटला ,नशिबाचा खेळ सारा आज मांडला’, या शीर्षक पार्श्वगीताने नाट्यप्रयोगातील आशय परिणामकारकपणे व्यक्त करीत ऑर्गन राकेश राऊत, तबला संतोष मेश्राम व ज्ञानेश्वर बोटकावार यांच्या संगीतसाथीने रंगत आणली. एकता साऊंड सिस्टिमचे डेकोरेशन, ध्वनी व्यवस्था व प्रमोद डोंगे यांचे नेपथ्य प्रयोगाकरिता सहाय्य ठरले.
नाटकातील संवादही प्रभावी व परिणामकारक आहेत. ‘बाळाला जन्म देणे हे स्त्रीचे कर्तव्य आणि त्या बाळाचे योग्य संगोपन करणं हा बापाचा धर्म आहे .’मातृत्वाशिवाय स्त्रीला पूर्णत्व नाही. ‘ तसेच “नागनाथ नागेश्वर : जगाचा पोशिंदा तू .. तुझ्यासारख्या पोशिंद्याला मारल्यानंतर किती सोप आहे त्याच्या मृत्युला आत्महत्येचा रूप देणं.. आबा, कित्येक दिवसांपासून तुझ्या ह्या जमिनीवर माझा डोळा होता.. आता तुला संपविल्यानंतर ही तुझी सुजलाम सुफलाम शेतजमीन बळकावून त्यावर करीन माझी फॅक्ट्री उभी. नागनाथ नागेश्वर आहे मी.. जे मला हव असतं ते मी मिळवल्याशिवाय राहत नाही आणि जो कुणी सहजा सहजी देत नाही त्याला मिटवल्याशिवाय राहत नाही.”शिवाय आनंद या पात्राचे संवाद तर विलक्षण आहेत. “आनंद: खाजगीकरणाचे सावट पसरलेल्या या देशात कारखानदार व उद्योगपती सरकारने विक्रीस काढलेल्या सरकारी कंपन्यांना विकत घेऊन या देशाला आणि देशातील जनतेला गुलामगिरीत ढकलत आहे. ज्या गुलामगिरीत ह्या जनतेला तो कारखानदार आणि उद्योगपती म्हणेल तसे वागवेल आणि म्हणेल तसे काम करवेल.. आज सरकारने कित्येक सरकारी कंपन्या विक्रीस काढल्याने आज ओ बी सी, एस टी, एस सी. आणि आरक्षक वर्गाचा आरक्षणच नाहीसा करण्याचा षढयंत्र रचला आहे सरकारने. मग आमच्या ओ बी सी, आणि इतर आरक्षण धारक जनतेच्या काय करायचं आणि कसं जगायचं सविता.. अग उद्योगपती आणि कारखानदाराच पोट भरणारी सरकार, पेट्रोल, डिझेल, गॅस , आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून आम्हा गरिबांचे जीवन जगणेच कठीण करून ठेवले आहे. आम्ही गरीब मेलो काय आणि जगलो काय..? याच्याशी काही करायचं नाही सरकारला.. ! मग सांग सविता दोन वेळचे अन्न तरी कसं मिळवायचं आपण? नाटककाराने उपस्थित केलेला हा प्रश्न अंतर्मुख करणारा असून नाट्य लेखकाचे लेखनकौशल्य व वैचारिकता ही स्पष्ट करणारे आहे. तद्वतच “रहीम: आनंद भैया.. हम ठहरे मुसलमान, इसलीये हमे कभी पाकिस्तानी, तो कभी आतंकवादी कहा जाता है. लेकीन तुम इसी मिट्टी में पैदा हूये , ईसी हिंदू धर्म से हो ना.. फिर तुम्ही क्यू सुख शांती से जिने नही दे रहे हैं…? क्यू तुम्हे तूम्हारे न्याय ओर ह्क के लिये लढना पढता हैं…? क्यू तुम्हे संविधान मे दिया गया पुरा आरक्षण नही मिल रहा है…? मुझे तो लगता है यहा के तुम्हारे लोग जो धर्म की बात करते हैं .. उन लोगो को ना तुम्हे धर्म से मतलब हैं ओर ना तुमसे. उन्हे तो इन करखानदार ओर उद्योगपती के जरियेसे तुम्हे गुलाम बनानेका मकसद हैं . डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ने कहा हैं ” जब तक गुलाम को गुलामी की जान ना करदो तब तक वो उसके उपर होनेवाले जुल्म के खिलाप आवाज नहीं उठायेगा. इसालिये हमे भी इस सरकार के खिलाप आवाज उठानी होगी. तब हमे हमारा हक्क अधिकार ओर आरक्षण मिलेगा “समाजातील धार्मिक द्वेष भावना व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे सविता: काय गुन्हा ?आज मी या सैतानाला संपवलं म्हणून मी कायद्याची गुन्हेगार ठरले .मग त्यावेळेस कुठे गेला होता तुमचं कायदा ?ज्यावेळेस या सैतानाने माझ्या आबाला मारलं. आमच्या पोटाची भाकर असलेले आमचे पीक जळले आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीलाही मारले. तेव्हा कुठे होता तुमचा कायदा? एवढेच नाही तर ह्या लक्ष्मीवर बलात्कार करून तिची अशी अवहेलना केली तेव्हा झोपी गेला होता का तुमचा कायदा? आणि आज मी सैतानाला संपवताच तुमच्या कायद्याला जाग आली. इन्स्पेक्टर साहेब सामान्य जनतेवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाला तुमच्या कायद्याने अटक केली तर असते खरं.. पण पैसा आणि सत्तेच्या बळावर स्वतःची सुटका करून पुन्हा राजरोसपणे या जनतेवर अत्याचार करीत राहिला असता ,म्हणून संपवून टाकलं मी ह्या सैतानाला. “तसेच रावणाची शिक्षा बिभीषणाला का? हा सविताने उपस्थित केलेल्या प्रश्नार्थकतेनेही परिणामकारकता अतिउच्च पातळीवर पोहोचवण्यात कलावंतही यशस्वी ठरलेत. नाटकातील प्रत्येक पात्र स्वतंत्र व्यक्तिमत्व सिद्ध करते . परिस्थितीने हवालदील झालेले , अगतिकता दर्शविणारे जसे आहेत; तसेच वेळप्रसंगी कणखरहीकृती धारण करीत आपले रूप साकार करण्यासाठी धडपडणारेही आहेत. उदा: सविता. निश्चितच सर्वच कलावंतांनी हावभाव व संवादफेकीने पात्र जिवंत केले. रसिक प्रेक्षकांनी नाट्यप्रयोगाचा मनमुराद आस्वाद घेतला. नाटककारांनी वैचारिक नाटक लिहून पुढील संभाव्य धोक्याच्या जाणिवेने प्रेक्षकांना डोळस करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
एकूणच शेतकऱ्यांचे दुःख,शोषण ,अत्याचार ,,धार्मिक सहिष्णुता, प्रेम ,सहानुभूती आणि संघर्ष अशा विविध वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे अत्याचार नाटक आहे. शेवटी सविता ही नागेश्वर नागनाथ यांना चांगला धडा शिकवते. सविता कुऱ्हाडीने नागनाथ नागेश्वरवर करत पूर्वी बोललेल्या वचनाची आठवण करून देते आणि पायात घुंगरू बांधून हिजडा बनत नाचायला त्याला भागच पाडते. हे दृश्य पाहताना प्रेक्षक अचंबित होतात. सिने. आसावरी तिडके यांचा चतुरस्त्र अभिनय, भारदस्त संवादफेक व हावभावामुळे नाट्यप्रयोगात परिणामकारकता वाढते. आबासाहेब, आनंद, लक्ष्मी यांच्या हत्येच्या वेळी कुठे गेला होता कायदा? हा उपस्थित केलेला प्रश्न प्रेक्षकांनाही अंतर्मुख करणारा आहे. एकूणच दिग्दर्शकाच्या कल्पकतेमुळे अत्याचार नाटकाने व्यावसायिक नाटकाची प्रकर्षाने अनुभूती दिली. रसिक प्रेक्षकांची मने जिंकत सकस अभिनयाच्या जुगलबंदीमुळे प्रयोग यशस्वी ठरला.
आबासाहेबांची शेतीनिष्ठा, सविताची पतीनिष्ठा, परिस्थिती समोर नतमस्तक न होता कणखरपणे तोंड देण्याची स्वाभिमानवृत्ती, बाणेदारपणा व आक्रंदन, अभयसाठी मंगळसूत्र काढून देण्याचा त्याग, अस्तित्व अबाधित ठेवत दुष्प्रवृत्तीना नामोहरम करण्याची जिद्द, आनंदचा टाहो ,रहीमचा सहकार्यशील प्रवृत्ती व माणुसकी धर्म ,प्रलयचे ढोंगी प्रेम, याबरोबरच सिने.नरेश गडेकर व आसावरी तिडके यांचा चतुरस्र असा अप्रतिम अभिनय अनुभवण्यासाठी हे अत्याचार हे अव्वल दर्जाचे नाटक अवश्य पाहायलाच हवे.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

