धनगरांचे समाजवास्तव व पुत्र हव्यासाचे नाट्य: नाट्यश्री मंडळाचे ‘नकोशी’ नाटक

0
141

प्रा. राजकुमार मुसणे

नाट्यश्री कला रंगभूमी वडसा प्रस्तुत, प्रकाश मेश्राम निर्मित,भगवान बुरांडे लिखित, ज्ञानेश्वर डांगे दिग्दर्शित, संगीत तीन अंकी,’ नकोशी ‘या नाटकाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सातरी यांच्या वतीने २० फेब्रुवारीला करण्यात आले. जन्मदात्या पित्यांना नकोशी असणाऱ्या मुलीची हृदय हेलावून टाकणारी कहाणी या नाटकातून दर्शविण्यात आली आहे.
पूर्वपरंपरेच्या प्रभावाखाली असलेल्या भारतीय समाजातील मुलींकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन, वंशाचा दिवा म्हणून मुलाला दिलेले अवास्तव महत्त्व यावर हे नाटक भाष्य करते. नकोशी या तीन अंकी नाटकातून लेखकाने मेंढपाळ धनगर समाजातील कौटुंबिक व्यथा प्रत्यकारीपणे मांडली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे पेशाने शिक्षक असलेले भगवान मनोहर बुरांडे यांनी व्यथा मायेच्या ममतेची,सर्वनाश व नकोशी ही तीन सामाजिक नाटके लिहिलेली आहेत. नकोशी या नाटकातून स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.
शिवा धनगरांना सई व आरोही या दोन मुलीनंतर पारंपरिक व्यवसाय सांभाळण्यासाठी मेंढपाळ म्हणून मुलाची अपेक्षा असताना तिसरीही मुलगी होते. मुलीच्या जन्माविषयी शिवा प्रचंड दुखी होतो. मेंढरं चारण्यासाठी व सांभाळण्यासाठी मुलगा हवा पण मुलगी झाल्याने तिला जमिनीवर आपटून मारण्याचा प्रयत्न करतो. या मुख्य विषयाबरोबरच नकोशी या नाटकातून धनगर समाजातील समस्या,गरीबी,कर्जबाजारीपणा, शोषण, धनगर समाजातील प्रश्न ,निसर्गामुळे होणारे त्यांची अवकळा, मेंढपाळांची रानोमाळ भटकंती , मेंढ्यांसाठी चारा नसणे, रोगराईमुळे मेंढरे मृत्युमुखी पडणे, त्यांचे खडतर जगणे आणि शिक्षणाविषयीची धडपड नाटकातून दर्शविण्यात आली आहे.

प्रा.सत्यदीप शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या सईला प्रोत्साहित करतो, प्रसंगी मदत करतो. मुली शिकल्या तर त्या अवकाशात उंच भरारी घेतील , महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाप्रमाणेच इतिहासातील अनेक दाखले देत शिक्षणाविषयीची जिद्द व भरारी घेण्यासाठी प्रेरित करतो. सईला नियमित कॉलेज करून शिक्षण पूर्ण करण्याकरिता प्रेरित करणारा प्राध्यापक सत्यजित वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे न पाहता आजच्या क्षेत्रात मुली कुठेच कमी नाहीत. वंशाच्या दिवा पेक्षाही त्या पणतीकडे पहा. मुलींच्या जन्माचे स्वागत करा. त्यांना वाचवा ,जगू द्या ,शिक्षण द्या. स्वावलंबी बनवा, उंच भरारी घेऊ द्या, असाच उपदेशही करतो. नाटककाराने मुलाच्या तुलनेत मुलीच अग्रेसर असल्याचे प्रबोधन करीत नकोशी म्हणून अवहेलना टाळणे ,दुय्यमत्व देणाऱ्या पुरुषी मानसिकतेला चपराक देत प्रबोधन केले आहे. अर्थातच मुलींच्या जन्माच्या स्वागताचे व मुलींना विविध क्षेत्रात लीलया संचार करण्याकरिता प्रेरित करण्याचे सामाजिक प्रबोधन नाटकातून केले आहे.
पुत्राचा हव्यास असलेला मेंढ्यांचा व्यवसाय करणारा मेंढपाळ धनगर शिवा (भगवान बुरांडे), कुटुंबासाठी खस्ता खाणारी चार वेळा गर्भपाताने खिळखिळी झालेली सहनशील तानी (उषा मुळे),कपडे शिवून शिक्षण पूर्ण करणारी हुशार, धडपडी सई (जयश्री), आराध्यवर प्रेम करणारी सहनशील,हजरजबाबी आरोही (वर्षा गुरनुले) , आरोहीवर प्रेम करणारा प्रणयात धुंद होणारा आराध्य (स्वर.अखिल भसारकर,), धुर्त, कपटी, स्वार्थी ,पैशाचा माज असलेला उद्योगपती, समर रेडीमेड कापड दुकानाचा मालक समर जहागीरदार,( विवेक दांगट), रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर (ज्ञानेश्वर डांगे),समर मालकाकडे कापड दुकानात नोकर असलेला विनोदी बाब्या (रुमाजी भुरले), हास्याचे फवारे उडविणारी उत्साही हरहुन्नरी बबनी( अनुराधा कांबळे), सईला शिक्षणासाठी प्रेरित करणारा प्राध्यापक सत्यजित (मंगल म्हशाखेत्री) या पात्रांच्या संवादातून कौटुंबिक व्यथा प्रकट करणारे सामाजिक नाट्य साकार होते.

‘स्त्री जन्माची करुण कहाणी ,जन्मा आली मी नकोशी’ या नाटकातील आशय व्यक्त करणाऱ्या शीर्षक गीता बरोबरच ‘वेड सजनीचे केलं रे ‘, तू चंद्राची कोर नकोस जाऊस दूर’, रानातील पाखर जगती माय विना, हट्ट सोड आहे अधुरा मी तुझ्याविना’ यासारख्या गीतांनी व किशोर मेश्राम ,सुभाष गोबाडे आणि सुनील मोहूर्ले यांच्या संगीत साथीने रंगत आणली.
‘नकोशी’ या नाटकातील विनोदही मजेशीर आहे. समर रेडीमेड कापड दुकानातील नोकर बाब्या व खरा विकणारी बबली यांच्यातील संवाद प्रेक्षकांना खळखळून हसवतो. रुमाजी भुरले व अनुराधा कांबळे यांची जुगलबंदी जबरदस्त ठरली.खातेस का ,देतेस का , रेटल्याशिवाय चव नाही ,पहिले इस्तेमाल करे ,भैताडबेलने, हरकंड्या, लावडीन , हुंगडवून, पूसकला, जोंधरा,बाया तिथे धंदा माणसं तिथं गंधा, झकपकबो,शीला कि जवानी अशा हास्योत्पादक संवादाने तसेच हत्ती पाण्यात पडला ? रांगोळी भोवती दिवे का लावतात ? इंजेक्शन टोचल्यावर रक्त का येते ? यासारख्या गंमतीदार प्रश्नानेही प्रेक्षक हसतो.
उशिरा सुरू झालेला नाट्यप्रयोग, प्रवेशागणिक होणारा विलंब, कलावंतावधील समन्वयाचा अभाव आणि पाठांतर नसल्यामुळे नाट्यप्रयोगात पकड निर्माण झाली नाही. लेखन उत्तम असूनही सादरीकरणातील कमकुवतपणामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
एकूणच मुलींचे शिक्षणाकरिता व मेंढपाळासाठी ५० हजाराचे कर्ज शिवा यांना समरशेठ करून घ्यावे लागते. कर्जापाई होणारे शोषण, अत्याचार, छळ , जबरदस्ती , पिळवणूक व अपमानास्पद वागणूक नाटकात दर्शविली आहे. स्त्री — पुरुष असमानतेवर प्रकाश टाकत मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याविषयीचा संदेश नाटककार भगवान बुरांडे यांनी दिला आहे. एकंदरीत भटकंती करणाऱ्या मेंढपाळ धनगर समाजाचे विदारक वास्तव व जन्मदात्यांनाही मुली नकोशा कशा आहेत, हे वास्तवचित्र नाटकातून प्रत्ययास येते.

प्रा. राजकुमार मुसणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here