मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

0
76

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत जाहीर.

सुविद्या बांबोडे विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर, दि.01 – चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गेल्यावर्षी अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतजमिनींचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. पण त्याचसोबत या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर व्हावी यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला होता. आता राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचेच हे यश असून शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये पुन्हा शेतकरी उभा राहू शकला पाहिजे, यादृष्टीने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरीता देखील मदत देण्यात येते. शासनाकडे जून ते सप्टेंबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रस्ताव आले होते. यात नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या विभागांमधून प्रस्ताव आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने यावर निर्णय घेत राज्यभरासाठी 2925.61 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्याला मंजुरी दिली आहे.

या प्रस्तावांमध्ये चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचाही समावेश होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव तयार करावे, अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी त्या कालावधीत दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने नागपूर विभागांतर्गत चंद्रपूरचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार जून व जुलै 2024 या कालावधीत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5309 शेतकऱ्यांना 7 कोटी 48 लक्ष 89 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. तर ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यांना 16.4 लक्ष रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

एकूण 2,254.76 हेक्टर शेतीचे नुकसान या चार महिन्यांच्या कालावधीत झाले होते. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी मानले आभार
मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली होती. तर शेतकऱ्यांच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्यालाही न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here