भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपट सुरु असतांना संभाजी महाराजांच्या शौर्याचे चित्रण करित तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही चित्रपटाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई विषयी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या असून वारंवार जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने रामनगर पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक आसिफरजा शेख यांना लेखी तक्रार देवून करण्यात आली.
यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वात बल्लारपुर महिला आघाडी संघटिका क्रिष्णाताई सुरमवार, चंद्रपुर उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, युवासेना माजी महानगर प्रमुख दिपक रेड्डी, भद्रावती महिला आघाडी उप तालुका प्रमुख राधाबाई कोल्हे, भद्रावती युवासेना माजी उप शहरप्रमुख विवेक दुर्गे, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे व शिवसैनिक निखिल सुरमवार यांची लेखी तक्रार देतांना उपस्थिती होती.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना सपा नेते व मानखुर्द- शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी हे देखील विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती, असा आशयाचे विधान जाणीवपूर्वक समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले.
“छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही,” असंही अबू आझमी यांनी म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून वारंवार जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.

